वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांसमोरही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:13 IST2017-05-24T00:13:37+5:302017-05-24T00:13:37+5:30

उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत.

Water crisis in addition to wild animals | वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांसमोरही पाणी संकट

वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांसमोरही पाणी संकट

नदी-नाले आटले : पाण्याची पातळीही घसरली, वन्यप्राणी मध्यप्रदेशकडे स्थलांतरित
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. प्रत्येक नदीपात्रात केवळ पाण्याचे अस्तित्व असल्याचे पांढरे निशाण दगडांवर पहावयास मिळत आहे. मोठ्या मुश्किलीने एखाद्या डोहात काही लीटर पाणी दिसल्यास ते फक्त सौभाग्यच म्हणावे लागेल.
मेळघाटात तापी, गडगा, सिपना, खापरा, खंडू, दवाल यासारखे मोठे नदी असून हजारोंच्या संख्येने नाले आहेत. परंतु मे महिन्याच्या शेवटचा पंधरवाडा सुरू असताना जवळपास बहुतांश नदी-नाले पूर्णपणे आटल्याचे चित्र आहे. नदी-नाल्यातील पात्र आटल्याने वन्यप्राण्यांसमोर भीषण जलसंकट उभे ठाकले आहे. आपली तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. गावाकाठातील नदीपात्रात सुकसुकाट असल्याने पाळीव प्राण्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे. वन्यप्राण्यांची अवस्था तर आणखी बिकट झालेली आहे. एकीकडे पाण्याची तीव्रता सुरू असताना दुसरीकडे जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे त्यांच्या वास्तव्यालाच धोका निर्माण झाला आहे. सध्या जंगलातील वृक्षवल्ली पाने विरहीत झाले असल्याने सावलीचाही प्रश्न वन्यप्राण्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मेळघाटातील वाघ, बिबट, रानगवा, अस्वल, जंगली डुकरे यांचेसह हरिण, सांभर, मोर व माकडांसारख्या वन्यप्राण्यांना उन्हाळा काढणे दुष्कर ठरत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाकडून तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी नसल्याने वन्यप्राणी जंगलाकाठच्या तापी नदी पाण्याच्या शोधात उतरून मध्यप्रदेशाकडे स्थांनांतरित करीत आहे. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वन्यप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Water crisis in addition to wild animals