जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:06 IST2016-04-27T00:06:23+5:302016-04-27T00:06:23+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत.

Water conservation campaign will avoid water crisis | जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा : राज्याचे जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईल
अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत. गोरगरिबांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देणारे हे अभियान आहे. समाजात या कामामुळे विश्वास निर्माण होत असून महाराष्ट्रात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जल पुनर्भरणाचे काम अधिक गतीने केल्यास पुढील काळात राज्यातील जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईल, असा विश्वास मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रोहयो व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव प्रवीण दराडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाचे सचिव नाईक यांच्यासह जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी विभागातील जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित उपस्थित होते.
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, जलयुक्त शिवाराची कामे हे स्वेच्छेने आणि मनापासून करत आहोत, असे समजावे. राज्यात जे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनापासून करतील ते अधिकारी राज्यातील ‘युनिक आॅफिसर’ बनतील. जलयुक्त शिवार हा कार्यक्रम नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. या कामात पारदर्शकता आहे. हे काम पवित्र असून यात झोकून देऊन काम करणाऱ्यांना कधीच पश्चा:ताप होत नाही. या कामासाठी मला कधीही बोलवा मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचा आदर आहे. त्यांनी सर्वोच्च प्राथमिकता याला दिली आहे.

जलयुक्त शिवारच्या कामांना भेटी
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अधीक्षक कृषी अधिकारी मुळे उपस्थित होते. सावर्डी येथील पाझर तलाव आणि डवरगाव येथील तलावातील काढलेल्या गाळाची पाहणी केली.

जलयुक्त शिवारमध्ये १३९६ गावांची निवड
विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी अमरावती विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-२०१६ या वषार्साठी १३९६ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. आतापर्यंत २६८८२ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ५२४ गावात लोकसहभागातून २२३४ कामे सुरु आहेत. या कामाद्वारे ७५२४५८७ घन मीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढलेल्या रुंदीकरण, खोलिकरण कामांची लांबी ३४४ कि.मी. आहे.

Web Title: Water conservation campaign will avoid water crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.