झोपड्यांमध्ये पाणी शिरले
By Admin | Updated: July 28, 2016 00:02 IST2016-07-28T00:02:10+5:302016-07-28T00:02:10+5:30
महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या, दलितवस्त्यांमध्ये मंगळवारी रात्री अतिवृष्टिने अचानक पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

झोपड्यांमध्ये पाणी शिरले
अतिवृष्टिने नुकसान : युवा स्वाभिमानची महापालिकेवर धडक
अमरावती: महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या, दलितवस्त्यांमध्ये मंगळवारी रात्री अतिवृष्टिने अचानक पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शहरात लहान, मोठ्या नाल्यांची साफसफाई केली नसल्यामुळे हा प्रसंग गरीबांवर उद्भवला, असा आरोप युवा स्वाभिमान संघटनेने करीत महापालिकेवर धडक दिली. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
आयुक्त हेमंत पवार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शहरात झोपडपट्टी, दलितवस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरुन गरीबांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अचानक पाणी घरात शिरल्यामुळे गरजेच्या वस्तू, शालेय साहित्य, अन्न- धान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी लहान, मोठ्या नाल्यांची साफसफाई व्यवस्थितपणे करण्यात आली असती तर ही परिस्थिती गरीबांवर उद्भवली नसती, असा आरोप युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. ज्या वस्त्यांमध्ये झोपडपट्टी, दलितवस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले त्या प्रभागातील सफाई कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, ही मागणी रेटून धरण्यात आली आहे. बेघर, नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, घरकूल निर्मिती करुन गरीबांना न्याय प्रदान करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विनादे गुहे, सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर, विनोद राजगुरे, ज्ञानेश्वर अंबुलकर, राहूल सावरकर, जानराव राजगुरे, प्रतिभा वधारे, दीपाली अंबुलकर, शोभा राजगुरे, सुवर्णा पांडे, वंदना अनासाने, दादाराव अंबुलकर, आनंदराव शेगोकार, शोभा कुचे, राजू मार्वे, शेख नासीर, लक्ष्मणबंठे, दशरथ जोंधळे, सुधाकर पांडे, विष्णू बंगाले, गोपाल भटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या वस्त्यांमध्ये शिरले पाणी
शहरात अतिवृष्टिने मंगळवारी झोपडपट्ट्या, दलिवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. यात आनंदनगर, महाजनपूरा, दत्तवाडी, गांधी आश्रम, हनुमाननगर, आमले वाडी, गडगडेश्वर, कांडलकर प्लॉट, भातकुली परिसर, रहेमतनगर, परदेशीपुरा, वसंतराव नाईक झोपडपट्टी, जेवडनगर, बडनेरा येथील मिलचाळ, जुनिवस्तीस्थित माताफैल, पाचबंगला, मोतीनगर आदी भागाचा समावेश आहे.
पोलिसांची उडाली तारांबळ
आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने अतिवृष्टिने गरीब, सामान्यांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित असल्यामुळे काहीच मोर्चेकरांना प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे पोलीस आणि मोर्चेकरांमध्ये वाद झाला. महापालिका प्रवेशद्वावर मोर्चेकरांना पोलिसांनी मज्जाव केला असता पोलिसांची तारांबळ उडाली, हे विशेष.