रखवालदाराने केली पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:06 IST2018-08-22T22:06:00+5:302018-08-22T22:06:32+5:30
पतीने धारदार शस्त्राने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना २१ आॅगस्टच्या मध्यरात्री पार्डी शिवारात घडली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

रखवालदाराने केली पत्नीची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : पतीने धारदार शस्त्राने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना २१ आॅगस्टच्या मध्यरात्री पार्डी शिवारात घडली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजरी मनसराम उईके (४०) असे मृताचे नाव आहे. विवेक सुभाषराव राऊत यांचे शेत मौजा पार्डी शिवारात असून, त्यामध्ये राम उईके हा रखवालदार पत्नी गजरी मनसराम उईके हिच्यासोबत राहत होता. मध्यप्रदेशातील मुलताई येथील गाजाठाणा येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्यात नेहमीच खटके उडून भांडण व्हायचे. २१ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
या वादातूनच रामने गजरीच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. हा वार वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळाहून आरोपीने पलायन केले.
शेतमालक विवेक राऊत हे २२ आॅगस्ट रोजी आपल्या शेतात गेले असता, त्यांना गजरी ही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्यांनी मोर्शी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यावरून ठाणेदार राजेश राठोड व त्यांची अधिनस्थ चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनाम्यानंतर मृत गजरीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आरोपी अद्याप पसार
आरोपी राम उईके हा हत्येनंतर पसार झाला आहे. मोर्शी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रारंभ केला आहे. गजरीचे हे दुसरे लग्न असल्याची माहिती याप्रकरणी पुढे येत आहे.
चौकशी करूनच ठेवा नोकर
गजरी उईके हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतमालकांनी शेतात रखवालदार ठेवताना त्यांची संपूर्ण चौकशी करून, गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून घ्यावी, असे आवाहन ठाणेदार राजेश राठोड यांनी केले.