वडाळी गार्डनवर पोलिसांचा ‘वॉच’
By Admin | Updated: December 14, 2015 00:14 IST2015-12-14T00:14:45+5:302015-12-14T00:14:45+5:30
निसर्गरम्य वडाळी बगिच्यावर यापुढे पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. रविवारी पाचपेक्षा अधिक महिला पोलिसांनी वडाळी बगिच्यात येणाऱ्या प्रेमीयुगुलांना फटकारले.

वडाळी गार्डनवर पोलिसांचा ‘वॉच’
प्रेमीयुगुलांवर टाच : नागरिकांमध्ये समाधान
अमरावती : निसर्गरम्य वडाळी बगिच्यावर यापुढे पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. रविवारी पाचपेक्षा अधिक महिला पोलिसांनी वडाळी बगिच्यात येणाऱ्या प्रेमीयुगुलांना फटकारले. अनेकांना समज देण्यात आली. महिला पोलिसांचे एका फिरत्या पथकाची या बगिच्यामधील प्रत्येक हालचालीवर सूक्ष्म लक्ष राहणार असून सहायक पोलीस आयुक्तांनी स्वत: वडाळी बगिचा गाठून संबंधित व्यवस्थापनाला दिशानिर्देश दिलेत.
वडाळी बगिच्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुलांचा वावर अन्य नागरिकांसाठी त्रासदायक आहे. अनेक महिला - पुरुषांना प्रेमीयुगुलांच्या ‘लिला’मुळे मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब ‘लोकमत’ने लोकदरबारामध्ये ठेवली. येथे दिवसाढवळ्या आडोशाला प्रेमीयुगुलांचा प्रेमालाप होत असल्याने पोलिसांनीही या गंभीर बाबीची दखल घेतली. या प्रेमविरांना आवरण्यासाठी महिला पोलिसांचे एक खास पथकच वडाळी बगिच्यात पाठविण्यात आले. त्यामुळे आज रविवारी गर्दीचा दिवस असतानाही तुलनेत प्रेमवीर येथे फिरकले नाहीत. बगिच्यात बसायला हरकत नाही. तथापि त्यांच्या ‘अगाध लिला’वर अनेकांनी आक्षेप नोंदविला. महिला पोलिसांच्या उपस्थितीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व्यवस्थापनानेही पोलीस प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)