साथरोग नियंत्रणासाठी १२५ वैद्यकीय पथकांचा ‘वॉच‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:53+5:302021-07-09T04:09:53+5:30
अमरावती : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती व साथरोगावर नियंत्रणसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला ...

साथरोग नियंत्रणासाठी १२५ वैद्यकीय पथकांचा ‘वॉच‘
अमरावती : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती व साथरोगावर नियंत्रणसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर, १२५ वैद्यकीय मदत पथके सज्ज ठेवण्यात आली असून, जिल्हा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती उपायोजना संदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत असते. एक जूनपासून जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ तासात नियंत्रण कक्षाची स्थापना केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक वैद्यकीय मदत पथक याप्रमाणे ५९ ठेवण्यात आली आहे. याशिवाय मेळघाटातील धारणी तालुक्यात ७ पीएचसी व १० उपकेंद्राच्या अखत्यारितील २० गावे, तसेच चिखलदरा तालुक्यातील ५ पीएचसी ७ उपकेंद्र व अखत्यारितील नदीकाठच्या १५ गावात तसेच जिल्हास, तालुका वैद्यकीय अधिकारी १५ पथके तयार केली आहेत. सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी इमर्जन्सी औषध कीट तयार ठेवण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहतील. नियंत्रण कक्षातील कर्मचारी गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी शुद्धीकरण दैनंदिन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून होत आहे की, नाही याची खातरजमा करण्यात यावी, ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध आहे का, याची खात्री करावी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. सर्व गावात वाड्या वस्तीच्या ठिकाणी साथरोग जनजागृती अभियान, हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच सर्व खातेप्रमुखांना क्लोरीन स्टेटर देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाणी उद्भवतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी शुद्धीकरणाबाबत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचा ठिकाणी पाहणी करून पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. संपर्क तुटणाऱ्या गावात स्वयंसेवकाच्या व संस्था निश्चित करण्यात येऊन त्यांच्याद्वारे प्राथमिक उपचारासाठी औषधी उपलब्ध करून प्राथमिक औषधोपचाराची सोय करणे सूचना अधिनस्त यंत्रणेला दिल्या आहेत.
कोट
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काय उपाययोजना करावयाच्या याबाबत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीतून सूचना केल्या आहेत. त्यांचा प्रत्येक आरोग्य केंद्रात कार्यवाही सुरू आहे.
डॉ. मनीषा सूर्यवंशी,
जिल्हा साथरोग अधिकारी, अमरावती