सैनिकांकडून ‘सखीं’नी घेतले रक्षेचे वचन!
By Admin | Updated: August 10, 2014 22:45 IST2014-08-10T22:45:43+5:302014-08-10T22:45:43+5:30
बहीण-भावाच्या प्रेमाचा आगळा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. भावा-बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा लोकमत सखी मंच व बालविकास मंचद्वारे

सैनिकांकडून ‘सखीं’नी घेतले रक्षेचे वचन!
अमरावती : बहीण-भावाच्या प्रेमाचा आगळा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. भावा-बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा लोकमत सखी मंच व बालविकास मंचद्वारे आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून सखींनी राज्य राखीव पोलीस बलातील जवानांना राख्या बांधून रक्षेचे वचन मागितले. त्यामुळे हा सण आगळा-वेगळा ठरला.
देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात जवान डोळ्यांत तेल घालून सदैव तत्पर असतात. त्यामुळेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत सखी-बालविकास मंच’द्वारे हा रक्षाबंंधनाचा उपक्रम साजरा करण्यात आला. भावनिक बंध घट्ट करण्यासाठी लोकमत सखी मंचच्या सदस्य सखींनी त्यांना राख्या बांधल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसआरपीएफचे असिस्टंट कमांडंट गोपालसिंह कोचर, भारतीय जैन समाज संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भंसाली, जैन युवामंचचे हरीश गांधी, व ‘लोकमत’चे जयंत कौलगीकर उपस्थित होते. यावेळी लोकमत सखीमंचच्या विभाग प्रमुख ज्योती वैद्य, संजना आंचलिया यांनी असिस्टंट कमान्डंट गोपालसिंह कोचर यांना राखी बांधली. त्यानंर उपस्थित सखींनी पीएसआय कमलसिंग, मारूती नेवारे, आर.डी. चव्हाण, आर.आर. चौधरी, पीआय बी.एस. चोपडे, डी.एस. वानखडे, कमांडंट एन.एन.सोळंके यांना राख्या बांधल्या. त्यानंतर दौन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
श्रध्दा डोंगरदिवे यांनी रक्षाबंधनावर आधारित गीत सादर केले. नीलिमा देशमुख यांनी देशभक्तीपर गीत प्रस्तुत केले. या कार्यक्रमात धामणगाव रेल्वे येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वनिर्मित ७०० राख्या वीर जवानांसाठी पाठविण्यात आल्या. या उपक्रमात शाळेचे शिक्षक श्रीकांत गुहे, रवींद्र गिरी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संगटना, जैन संस्कार युवामंच, ‘लोकमत’च्या सर्व विभाग प्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ‘लोकमत’च्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या हजारो राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी खुद्द कमांडंट साहेबांनी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)