वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची आदिवासी मुलांना मारहाण
By Admin | Updated: August 28, 2014 23:28 IST2014-08-28T23:28:32+5:302014-08-28T23:28:32+5:30
गणेश मंडळाचे काम करून चहा पिण्यासाठी चौकात आलेल्या तीन मुलांना सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची आदिवासी मुलांना मारहाण
गुन्हा दाखल : सेमाडोह येथील घटना
चिखलदरा : गणेश मंडळाचे काम करून चहा पिण्यासाठी चौकात आलेल्या तीन मुलांना सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मोगरे यांनी बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास संदीप छोटेलाल कास्देकर (१६), अंकुश जामूनकर (१५) व धीरज गणेश गिरी (१५, सर्व रा. सेमाडोह) या मुलांना मारहाण केल्याची फिर्याद चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेमाडोह पोलीस चौकीत गुरूवारी सकाळी दाखल केली. या तक्रारीवरुन चिखलदरा पोलिसांनी मोगरे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चिडविल्याचा आरोप
गणेशोत्सव मंडळाचे काम करीत असताना उपरोक्त मुले चहा पिण्यासाठी सेमाडोह चौकात जात असताना एकमेकांना ‘हांड्या, हांड्या’ असे चिडवित होते. त्या व्यतिरिक्त आपण काहीच केले नाही.
चहा पीत असताना मोगरे आले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी तिघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेविरूद्ध गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध आदिवासी अत्याचारविरूद्ध प्रतिबंध अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वृत्त लिहिस्तोवर चिखलदरा पोलिसात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून कुठलीच तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. क्षुल्लक कारणातून घडलेल्या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. (तालुका प्रतिनिधी)