कारागृहात सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’
By Admin | Updated: May 25, 2016 00:26 IST2016-05-25T00:26:05+5:302016-05-25T00:26:05+5:30
कारागृहांच्या कारभारावर आजही ब्रिटिशकालीन पद्धतीचा पगडा असला तरी कैद्यांसाठीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक बदल करून अद्ययावत यंत्र सामग्रीची पूर्तता करण्यात आली आहे.

कारागृहात सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’
गणेश वासनिक अमरावती
कारागृहांच्या कारभारावर आजही ब्रिटिशकालीन पद्धतीचा पगडा असला तरी कैद्यांसाठीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक बदल करून अद्ययावत यंत्र सामग्रीची पूर्तता करण्यात आली आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’चा वापर केला जात आहे. त्यामुळे आता एका टोकाहून दुसऱ्या टोकावरील सुरक्षा रक्षकांना एकमेकांशी संवाद साधणे सुकर झाले आहे.
कारागृहातील कैद्यांची दिनचर्या ही ‘सुर्योदय ते सूर्यास्त’ अशी असते. मात्र, कारागृहात घडणाऱ्या अप्रिय घटना रोखण्यासाठी गृह विभागाकडून नानाविध उपाययोजना केल्या जातात. कारागृहांमध्ये मोबाईल आढळणे, नागपूर जेलब्रेक होणे, दारु, गांजा पोहोचणे याबाबी सुरक्षेसाठी घातक आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने अंतर्गत, बाह्य सुरक्षेसाठी अद्ययावत सयंत्रांचा वापर सुरु केला आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे, रेडिओ मिर्ची, कैद्यांची आॅनलाईन मुलाखत, ई- प्रिझम, एका क्लिकवर बंद्यांना माहिती अशा विविध सुविधा सुरु करुन विदर्भात अग्रस्थानी राहण्याचा बहुमान पटकाविला आहे. कारागृहात मनुष्यबळाची वानावा ही नित्याचीच बाब असली तरी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत सयंत्रांमुळे सुरक्षा यंत्रणा हाताळताना सुरक्षा रक्षकांना मदत होऊ लागली आहे. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, प्रसिद्ध खून खटले, मोका, टाडा आदी गुन्ह्यातील आरोपी जेरबंद आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी हे कारागृह मुंबई, येरवड्यानंतर गणले जाते. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेकडे गृहविभागाचे लक्ष राहाते. त्यामुळे अंतर्गत, बाह्य सुरक्षेसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा केला जातो. सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’चा वापर केला जात असून त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांना देखील वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. तटरक्षकांना दुर्बिणीसह वॉकीटॉकी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांना संवाद साधणे सुकर झाले आहे. मुख्य प्रवेशद्वार, कार्यालय, दोन मनोरे, १६ बराकी, तटाला सुरक्षा देणाऱ्या रक्षकांना वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ तुरूंगाधिकारी नितीन क्षीरसागर जबाबदारी सांभाळत आहेत.
तटाला वेढा : अंतर्गत, बाह्यसुरक्षेसाठी वापर
बदलत्या काळानुसार कारागृहात सुरक्षेसाठी उपाययोजना के ल्या जात असल्याने सुरक्षा यंत्रणा हाताळणे सोयीचे होत आहे. कारागृहात २५ वॉकीटॉकी आल्या असून त्यांचा सुरक्षेच्या अनुशगाने वापर होत आहे. पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. हे एक चांगले पाऊल ठरेल.
- जयंत नाईक,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.