जागोजागी मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: June 13, 2015 00:13 IST2015-06-13T00:13:14+5:302015-06-13T00:13:14+5:30
राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अनेक रस्त्यांवर धोकादायक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

जागोजागी मृत्यूचे सापळे
जीव धोक्यात : प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस यंत्रणेची मूकसंमती?
गजानन मोहोड अमरावती
राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अनेक रस्त्यांवर धोकादायक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत व वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रक, मालवाहू आॅटोच्या बाहेर लोखंडी सळाखी, कांबी, अॅँगल आणि पत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
नियमबाह्य, अवैध वाहतुकीमुळे आजवर कित्येकांचे बळी गेले. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून ही वाहतूक बिनधास्त सुरू असल्याने दररोज लहानमोठे अपघात घडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर १५० कि.मी. अंतरावर दररोज शेकडो वाहने धावतात. बहुतेक वाहतूक नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणारा माल, वाहनावर उंचच्या उंच लोंबकळणाऱ्या वस्तुंची धोकादायक वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. यामुळे अपघात होत आहेत. नियमबाह्य वाहतुकीला लगाम घालण्यात संबंधित विभागाला अपयश आल्याचे चित्र आहे. मृत्यूचे हे सापळे घातक ठरत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली
नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली होत आहे. धोका दर्शविण्यासाठी वाहनाच्या मागच्या बाजूला लाल कापड, किंवा लाल दिवा सुरू ठेवणे आवश्यक आहे. वाहनाबाहेर आलेले साहित्य गोणपाटात गुंडाळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
सर्वोच्च न्यायालयाचे यासंदर्भात कठोर आदेश आहेत. ‘फ्लार्इंग स्कॉड’ द्वारे अशा वाहनांवर कारवाई केली जाते. यासाठी ‘टार्गेट’ देखील दिले जाते. अशा वाहतुकीसाठी परवानगी मागितल्यास परवानगी दिली जाते.
- मा.ब. नेवस्कर,
सहायक प्रादेशिक
परिवहन अधिकारी.