कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला चार बळींनंतर जाग
By Admin | Updated: April 27, 2016 00:02 IST2016-04-27T00:02:54+5:302016-04-27T00:02:54+5:30
परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला.

कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला चार बळींनंतर जाग
शेकडो वाहनांची तपासणी : ३ अधिकारी, ८० कर्मचाऱ्यांचा ताफा, ६२ हजारांचा दंड, ६०६ केसेस
नरेंद्र जावरे परतवाडा
परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला. दंगा नियंत्रण पथकात एक दिवसासाठी ८० कर्मचारी व तीन अतिरिक्त अधिकारी पाठवून ही कारवाई करण्यात आली.
परतवाडा बसस्थानक, जयस्तंभ चौक, चिखलदरा स्टॉप, बाजार समिती, मिल स्टॉप या आदी महत्त्वपूर्ण वर्दळीच्या रस्त्यावर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. येथील वाहतूक विभागात नव्यानेच रुजू झालेले वाहतूक उपनिरीक्षक निशांत पुलेर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभळी, धाकडे आदी अधिकाऱ्यांसह त्यांच्या दिमतीला जवळपास ८० अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
बेशिस्त वाहतुकीचा सामना
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातून अमरावती, अकोला, बैतूल, इंदूर, धारणी, चांदूरबाजार या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. दिवसभर शेकडो वाहन ये-जा करतात. अशात परतवाडा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा सामना या तपासणी अधिकारी कर्मचाऱ्यांना करावा लागला. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतांना अधिकाऱ्यांंनी सोबत फुलके आणली होती. तर सतत बेशिस्तीत भरधाव आणि वेगाने वाहने चालविणाऱ्यांची सोमवारी मात्र पंचाईत झाली. भरधाव दुचाकीसह ट्रकचालकांवर कारवाई होत असताना नियम धाब्यावर बसवून वाटेल तेथे थांबणे, रस्त्याच्या मधातून आॅटो वळविणे व उलट मुजोरी करणाऱ्या आॅटोंना लगाम लावणे गरजेचे झाले आहे. शहरात आवश्यकतेपेक्षा बेरोजगारीतून आॅटोची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्या दादागिरीचा प्रयत्य शहरवासीयांंना दररोज येत आहे.
सहाशे केसेस ६२ हजारांचा दंड
परतवाडा शहरात सोमवारी पोलीस विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत सायंकाळशी ५ वाजेपर्यंत हजारांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ट्रिपल शीट, विनावाहन परवाना, चालविण्याचा परवाना नसलेले. अवैध वाहतूक अशा एकूण ६०० सहा केस करून त्यांच्याकडून ६२ हजार ६० रुपये दंड वसूल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
नवा गडी नवा राज
परतवाडा वाहतूक शाखेची नव्याने निशांत पुळेकर यांनी सूत्रे सांभाळल्या नंतर त्यांच्या दिमतीला नवीन कर्मचाऱ्यांचा ताफा देण्यात आला आहे. तेव्हा कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि सामान्य नागरिकांचा अपघातात नाहक बळी जाणे थांबविण्याची अपेक्षा बळावली आहे. मात्र ही स्थिती काहीच दिवस राहणार असेल तर समस्या पुन्हा उदभवल्याशिवाय राहणार नाही.
चार बळींनंतर आली जाग
शहरात अवैध आणि भरधाव वाहतुकीमुळे अपघात होत असून त्यात चौघांचा बळी गेला. शहरातील नेत्यांसह, राजकीय पक्षांना जाग आली. सर्वसामान्य नागरिक हातात कायदा घेऊ लागले. ट्रक आठवडी बाजारात दिसताच त्यावर दगडफेकहोऊ लागली आणि मग पोलीस विभागाला जाग आली. पालकमंत्री प्रवीण पोटेंना याबाबत भेटल्याने जिल्हाधिकारी किरण गीत्तेंनी दखल घेतली. इकडे आ.बच्चू कडू यांना बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला. वाहतूक नियम सांगणे त्यांनाच भोवले. गुन्हा दाखल झाला. आठ वाहतूक कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी आणि सोमवारी शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडे गिरविण्यात आले.