डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 27, 2016 00:18 IST2016-07-27T00:18:35+5:302016-07-27T00:18:35+5:30
महापालिकेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या १८ डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे.

डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा
प्रशासकीय पेच : नवे वैद्यकीय आरोग्य अधिकारी केव्हा ?
अमरावती : महापालिकेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या १८ डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे. मात्र दुसरीकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारीपद महापालिका स्तरावर भरणे शक्य नसल्याने प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे महत्वपूर्ण पद कायमस्वरुपी भरण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी अर्ज मागविलेत. जाहिरातीतील निकष पूर्ण करणाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्जही दाखल केलेत. त्यात वर्धापासून लातूरपर्यंतच्या १८ डॉक्टरांचा समावेश आहे. ३१ मेपर्यंत अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेनंतर ५ जूनला लेखी परीक्षा व मुलाखती होणार होत्या. १८ पैकी ५ डॉक्टरांचे अर्ज निकष पूर्ण करणारे आहेत. त्यांना अद्यापही मुलाखत व लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आलेले नाही. ५ जूनला आयुक्त हेमंत पवार महापालिकेत नसल्याने लेखी परीक्षा व मुलाखतीची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे उपायुक्त प्रशासन यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आयुक्त पवार रजेवरही गेलेले नाहीत. पालिकेतील काहींनी वैद्यकीय आरोग्य पदावर प्रभारींचेच राज्य राहावे, यासाठी खासा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी यंत्रणेची दिशाभूल झाल्याचाही आरोप होत आहे. सुमारे ७ लाख अमरावतीकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या मुलाखत व लेखी परीक्षेचा मुहूर्त काढावा, अशी मागणी पात्र डॉक्टरांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
लेखी परीक्षा, मुलाखत केव्हा?
वैद्यकीय आरोग्य अधिकारी या नियमित पदासाठी ३१ मे पर्यंत अर्ज स्विकारण्यात आले. त्यानंतर १ जूनला पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार होती, तर ५ जूनला लेखी परिक्षा आणि मुलाखती होणार होत्या. तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र दोन महिने होत असताना या पदाच्या लेखी परिक्षा व मुलाखतीला तारीख घोषित न झाल्याने अर्ज भरणाऱ्यांमध्ये शंकेचे काहूर उठले आहे.
प्रभारींचे ग्रहण ‘जैसे थे’
वैद्यकीय आरोग्य अधिकारी या महत्त्वपूर्ण पदाला ग्रहण लागले आहे. मागील आठ वर्षांपासून आलटून पालटून प्रभारींवर कारभार हाकला जातो आहे. थेट राष्ट्रीय माध्यमांमध्ये जाहिरात दिल्यानंतर व उमेदवारांकडून व्यापक प्रतिसाद मिळाल्यानंतरही ही प्रक्रिया गर्भातच आहे.
यंत्रणेसमोर पेच
वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदासाठी लेखी परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन उपायुक्त विनायक औगड यांनी केले होते. मात्र लेखी परीक्षा केव्हा, याबाबत खुद्द औगडही संभ्रमित आहेत. क्लास वन अधिकारीपद मनपा स्तरावर भरणे शक्य नसल्याने त्यांचेसमोरही पेच उभा ठाकला आहे.
वर्चस्वाची किनार
वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता प्रभार घेण्यासाठी गतवर्षी दोन वरिष्ठ डॉक्टर परस्परांसमोर ठाकले होते. ही वर्चस्वाची लढाई होती. तुर्तास सीमा नेताम यांच्याकडे या पदाचा प्रभार आहे. या महत्वपूर्ण खुर्चीवर कायमस्वरुपी अधिकारीच बसूच नये, अशी तजवीज करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशिल असताना आयुक्तांसमोरही त्या जाहिरातीचे काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच पदभरतीसंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल.
- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका