होस्टेल प्रवेशासाठी ‘एसएमएस’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 29, 2016 00:21 IST2016-07-29T00:21:23+5:302016-07-29T00:21:23+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश ‘एसएमएस’ची प्रतीक्षा आहे.

होस्टेल प्रवेशासाठी ‘एसएमएस’ची प्रतीक्षा
आॅनलाईन प्रक्रियेला उशीर : निवड यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
अमरावती : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश ‘एसएमएस’ची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये सुरू झाले असताना वसतिगृहात प्रवेश मिळाले नसल्याचे वास्तव आहे. शासनाने उशिरा आॅनलाईन प्रक्रिया राबविल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
अनुसूचित जाती संवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. याकरिता मुले, मुलींचे स्वतंत्र वसतिगृहे शासनाने निर्माण केली आहेत. वसतिगृहात प्रवेशासाठी यावर्षी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही प्रक्रिया उशिरा राबविण्यात आल्यामुळे अद्यापही अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, हे खरे आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात शालेय, इयत्ता १० नंतर अभ्यासक्रम, पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशांचे प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. शालेय व इयत्ता १० नंतरच्या विद्यार्थ्यांना ३१ जुलै तर पदवीधर, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना २० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करण्याची संधी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना ३ ते १५ आॅगस्टपर्यंत अर्ज सादर करावे लागतील. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतीच निवड यादी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांची निवड यादी ७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची निवड यादी ८ आॅगस्ट रोजी तर पदवीधर अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांची निवड यादी १० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पहिली निवड यादी २२ आॅगस्ट रोजी जाहीर केली जाईल. जिल्ह्यात समाज कल्याणची एकूण २४ वसतिगृहे असून २८६५ विद्यार्थी क्षमता आहे. (प्रतिनिधी)
‘‘ वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन प्रक्रिया असल्यामुळे त्यापूर्वी प्रवेशाची यादी प्रसिद्ध करता येत नाही. अर्ज सादर करण्याचा कालावधी ३१ जुलैपर्यंत आहे. लॉगिंग आटोपल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. ‘एससी’ संवर्गातील विविध प्रवर्गांना प्राधान्य दिले जाईल.
- प्राजक्ता इंगळे,
सहायक आयुक, समाजकल्याण