अस्थीरुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 18, 2014 23:16 IST2014-08-18T23:16:04+5:302014-08-18T23:16:04+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन ) च्या वार्ड क्रं.१५ मधील अस्थिरोग विभागात बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. अपघातात जखमी झालेल्या काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन

Waiting for osteoarthritis | अस्थीरुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत

अस्थीरुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन ) च्या वार्ड क्रं.१५ मधील अस्थिरोग विभागात बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. अपघातात जखमी झालेल्या काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना केवळ उपचार्थ दाखल करुन घेण्यात आले आहे. ८ ते १० दिवसापासून हे रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून त्यांना वेदना असह्य झाल्या आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इर्विन रुग्णालयात रुग्णसेवा कोलमडल्याचे चित्र आहे. अपघाताच्या घटनेनंतर जखमींना उपचार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले जाते. अपघातात जखमींवर उपचार करित असताना काही रुग्णांची हाड किंवा फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न होते. अशा रुग्णांना उपचारासाठी अस्थिरोग विभाग वार्ड क्रं. १५ मध्ये दाखल केले जाते. दरम्यान फ्रॅक्चर असणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन कापडाचे साधे प्लॉस्टर लावून ठेवण्यात येते. सद्यस्थितीत या वार्डामध्ये ३३ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये जुने व नवीन रुग्णांचा समावेश आहे. मात्र या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण खाटावर असून पुढील उपचाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. या रुग्णांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क करुन विचारणा केली असता, अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत खाटावरच असल्याचे निर्देशनास आले.
शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरळीत
अपघातात किंवा वादविवादात जखमी झालेल्या रुग्णांना या वार्डात दाखल करण्यात येते. मात्र त्यांच्या जखमा दुरुस्त झाल्यावरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. तसेच जुन्या रुग्णांना आधी प्राधान्य देऊन शस्त्रक्रिया केली जातात. त्यामुळे नवीन रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. शासकीय योजनेतील लाभार्थींचे कागदपत्रे जुळवा-जुळव करण्यात उशीर होत असल्याने त्यांच्या उपचारात दिरंगाई होत असल्याची माहिती तेथील परिचारिकेने दिली.
अधिकारी सुटीत मग्न
जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ तास आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र शासकीय सुटीच्या दिवशी रुग्णालयातील डॉक्टरांची सुटी असल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्याची प्रक्रिया थंडावते. अश्याप्रसंगी रुग्णांना उपचाराकरिता ताटकळत रहावे लागते. केवळ आपातकालीन स्थितीतच येथील कर्मचारी डॉक्टरांशी संपर्क साधून बोलावितात. अन्य वेळेस रुग्णांचे एक्सरे सुध्दा काढल्या जात नाही. दाखल झालेल्या रुग्णांचे दुसऱ्या दिवशी एक्सरे काढल्या गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तब्बल सात दिवसांनी शस्त्रक्रिया
भातकुली तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी गजानन कृष्णराव देशमुख यांना जखमी अवस्थेत वार्ड क्रमांक १५ मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत असतानाही साधे प्लॉस्टर्स लावण्यात आले होते. ३० जुलै रोजी दाखल झालेल्या गजानन यांच्या हातावर ६ आॅगष्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान वार्डातूनच त्यांचा मोबाईल सुध्दा चोरीस गेला.
१८ दिवसांची प्रतीक्षा असह्य
१ आॅगष्ट रोजी अपघातात जखमी झालेल्या बाबाराम जयराम सावरकर यांच्या पायाचे हाड तुटले. त्यांना तत्काळ वार्ड क्रं १५ मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या पायावर अद्यापर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. अशाप्रकारचे वेदना सहन करणारे अनेक रुग्ण वार्डात आहेत.

Web Title: Waiting for osteoarthritis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.