‘त्या’ अपंगांना पालिका संकुलातील गाळ्यांची प्रतीक्षा

By Admin | Updated: May 26, 2015 00:24 IST2015-05-26T00:24:01+5:302015-05-26T00:24:01+5:30

मोर्शी मार्गावर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दुकाने बांधली. यातील तीन टक्के दुकाने अपंगांना देण्यात ...

Waiting for the 'missing' dams in the municipal complex | ‘त्या’ अपंगांना पालिका संकुलातील गाळ्यांची प्रतीक्षा

‘त्या’ अपंगांना पालिका संकुलातील गाळ्यांची प्रतीक्षा

निर्णय केव्हा? : २० अर्ज दाखल, दीड वर्षांपासून फक्त टोलवाटोलवी
चांदूरबाजार : मोर्शी मार्गावर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दुकाने बांधली. यातील तीन टक्के दुकाने अपंगांना देण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.
चांदूरबाजार शहरात १४४ अपंग असल्याची नोंद पालिका कार्यालयात असून यापैकी २० अपंगांनी न.प. मार्फत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ५२ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या २६ गाळ्यांपैकी एक गाळा मिळण्यास आपले अर्ज २८ नोव्हेंबर २०१३ रोजी न.प.ला दिले. यात वसीम अली हफीज अली, जमरुन बी शहादत खां, अ.रहेमान अ. कादर, मो. आसीफ रसूल पटेल, धनंजय बबनराव खंडारे, जमीर अहेमद बशीर अहेमद, ललिता बद्रीप्रसाद पालीवाल, शबाना परवीन जावेद इकबाल, अत्ताउल्लाखान सरफराज खान, हेमंत शालिकराम कोठाळे, फिरोज खान हसन खान, तुळशीराम तायवाडे, प्यारे खान नसीर खान, शे. अनिस शे. इस्माईल, देवेंद्र चव्हाण, नरेंद्र वर्मा, शगुणा परवीन अ. रफीक, समीर खान अहेमद खान, मुख्त्यार अहेमद खान, शालिनी शेळके यांनी दीड वर्षांपासून अर्ज दिलेले आहेत. त्यांना गाळे मिळण्याची प्रतीक्षा आहे.
चांदूरबाजार नगरपालिकेने ३ जून २०१४ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. १९३ प्रमाणे नगरपरिषद क्षेत्रातील अशा व अपंगांना मालमत्ता करामध्ये २० टक्के सवलत देण्याचे पारित केले होते. मात्र या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसून एकाही अपंगाला २० टक्के सूट देण्यात आलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)

२० पैकी एका अपंगाचे झाले निधन
चांदूरबाजार नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ५२ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या २६ गाळ्यांचे २९ नोव्हेंबर २०१३ रोजी लिलाव करण्यात आले. या गाळे विक्रीतून महापालिकेला जवळपास अडीच कोटी रुपये प्राप्त झाले. तेव्हापासून अपंगांना राखीव गाळे अध्यापपर्यंत मिळालेले नाहीत. यात २० अर्जदारांपैकी एका विवाहित अपंगाचे विद्युत शॉक लागून निधन झाले. त्याची पत्नी व तीन मुले आजही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.

मुख्याधिकारी म्हणून मला रुजू होऊन एकच महिना झाला आहे. सभागृहाने अपंगांना गाळे देण्यासंबंधीच्या ठरावाची माहिती घेऊन अपंगांना न्याय देण्यात येईल.
- मेघना वासनकर,
मुख्याधिकारी, चांदूरबाजार.

Web Title: Waiting for the 'missing' dams in the municipal complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.