निवडणुकीची तारीख अन् करप्रणाली निर्णयाची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 27, 2014 23:11 IST2014-08-27T23:11:01+5:302014-08-27T23:11:01+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अद्याप काहीच ठरविले नसल्याने महापालिका प्रशासन चिंतीत आहे.

निवडणुकीची तारीख अन् करप्रणाली निर्णयाची प्रतीक्षा
अमरावती : महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अद्याप काहीच ठरविले नसल्याने महापालिका प्रशासन चिंतीत आहे. राजकारण, अर्थकारण या दोन्ही बाबींशी हा विषय निगडित असल्याने महापालिकेला शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.
महापौरपदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित असले तरी कोणत्या तारखेला ही निवडणूक घ्यावी, हा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपदाची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी महापौरपदाची निवडणूक होत असल्याने येथील राजकारण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते महापौरपदाच्या तारखेकडे लक्ष लावून आहेत. विद्यमान महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.
तत्पूर्वी महापौरपदाची निवडणूक आटोपणे महत्त्वाचे आहे. महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख केंव्हा येणार, या निर्णयाची दिवसागणिक प्रतीक्षा असताना एलबीटी किंवा जकात यापैकी कोणता कर महापालिकेत लागू करावा, याविषयी प्रशासनाला निर्णय घ्यायचा असून याबाबत शासनाने पत्र पाठविले नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकांत एलबीटी की जकात हा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा, असा निर्णय दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर येथील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराचा भरणा करताना हात रोखल्याने एलबीटीचे उत्पन्न ७५ टक्के माघारले. परिणामी महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नगर विकास मंत्रालयाने महापालिकेत कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, हा निर्णय शासनाला कळविण्याबाबतचे पत्र पाठविले तरच सर्वसाधारण सभेत निर्णय घेता येईल, अथवा हा निर्णय लांबणीवर पडेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.