पशुधनाला डॉक्टरांची प्रतीक्षाच!
By Admin | Updated: July 13, 2014 22:47 IST2014-07-13T22:47:30+5:302014-07-13T22:47:30+5:30
मानोरा तालुक्यातील दोन पशुचिकित्सालय व सहा पशु प्रथमोपचार केंद्राची स्थिती पाहता पशुवैद्यकीय सेवा कोमात गेल्याचे चित्र दिसून येते.

पशुधनाला डॉक्टरांची प्रतीक्षाच!
मानोरा : जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शासनाच्या वतीने पशुवैद्यकीय विभागाची निर्मिती करण्यात आली. मात्र मानोरा तालुक्यातील दोन पशुचिकित्सालय व सहा पशु प्रथमोपचार केंद्राची स्थिती पाहता पशुवैद्यकीय सेवा कोमात गेल्याचे चित्र दिसून येते. मानोरा तालुक्यात मानोरा व पोहारादेवी येथे पशुचिकित्सालय आहे. तसेच कारखेडा, कुपटा, शेंदुरजना, कोंडोली, इंझोरी, साखरडोह येथे पशु प्रथमोपचार केंद्रत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या चिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकार्याचे पद गेल्या अनेक दिवसापासून रिक्त आहे. या पदाचा प्रभार कनिष्ठ अधिकारी सांभाळत तसेच अनेक ठिकाणी पदे रिक्त आहेत. यामुळे पशुपालकांना आरोग्य सेवा संदर्भात अडचण निर्माण झाली आहे. कारखेडा येथे दोन श्रेणीचा दवाखाना आहे. या ठिकाणी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकार्यांचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार दुसर्या दवाखान्याच्या डॉक्टरवर आहे. परंतु क्षमतपेक्षा अधिक कामे असल्याने संबंधित डॉक्टरांना येथे येण्यास वेळ मिळत नाही. परिणामी येथील पशुपालकांचे हाल होत आहेत. या केंद्रावर सुमारे २५ गावातील गुरांचा उपचार केला जातो. डॉक्टर नसल्याने त्यांना परत जावे लागते किंवा खासगी डॉक्टरकडे इलाज करुन घ्यावा लागतो. परिसरात पायखुरी, तोंडखुरी या आजाराची साथ सुरु आहे. आतापर्यंंत काही गावात लसीकरण करण्यात आले नाही. शेतकरी जोडधंदा म्हणून बकर्या, गाई, म्हशी पाळतात शेती कामासाठी बैलजोडी वापरतात. त्याच्या आरोग्याची हमी मात्र त्यांना या पशुवैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे मिळत नाही. तालुक्यातील सर्वच दवाखान्यांच्या इमारतीची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी वालकंपाउंड नाही. गुरांना बांधण्यासाठी शेड नाही. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. डॉक्टर नसल्याने अनेक ठिकाणी पट्टीबंधक, कंपाउंडरच पशुवर इलाज करताना दिसतात. कृत्रीम रेतन, पशुशिबिर, पशुखाद्य, मार्गदर्शन, दुधाळ जनावरासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे.