१३ कोटींच्या रस्त्याची लागली वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:42+5:302021-03-16T04:13:42+5:30
ठिकठिकाणी उखडला रस्ता : काम पूर्ण न होताच काढले देयक धारणी : अमरावती-भोकरबर्डी-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर धारणी शहरात रस्ता ...

१३ कोटींच्या रस्त्याची लागली वाट!
ठिकठिकाणी उखडला रस्ता : काम पूर्ण न होताच काढले देयक
धारणी : अमरावती-भोकरबर्डी-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर धारणी शहरात रस्ता रुंदीकरणाची १३ कोटी रुपयांची कामे सन २०१६-१७ मध्ये मंजूर झाली होती. सदर कामे परतवाड्याच्या एका कंत्राटदाराला देण्यात आली होती. त्यांनी तब्बल चार वर्षे लोटूनही काम अपूर्णच ठेवले. त्यातच नवीनच डांबरीकरण झालेला रस्ता ठिकठिकाणी उखडायला लागला आहे. १३ कोटींच्या या रस्त्याची वाट लागली आहे.
अभियंत्यांच्या गैरहजेरीत दर्जाहीन व निकृष्ठ काम, अनियमितता, विनापरवाना गौन खनिजाचा वापर, रस्त्यावरील झाडे व विद्युत पोल न हटवता सिमेंटच्या नाल्यासह रस्ता डांबरीकरणाचे काम झाल्याने हा रस्ता चर्चेत राहिला आहे. पहिल्याच पावसात त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले, तर डांबर वाहून गेल्याने गिट्टी उखडून वर आली आहे. त्यामुळे वाहन स्लिप होऊन अपघात होत आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. चार वर्षे होऊनही काम अपूर्ण असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांनी कंत्राटदाराचे अपूर्ण बांधकांमाचे देयक काढल्याचा आरोप आहे.
बॉक्स
शाळकरी विद्यार्थिनी नालीत पडली
रस्ता दुभाजक तयार करताना दोन्ही साईडने नाली बांधकाम करण्यात आले. त्यावर काही ठिकाणी सिमेंटचे झाकण बसविण्यात आलेले नाही. त्या नालीत समोरच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शाळकरी विद्यार्थिनी पडून गंभीर जखमी झाली होती. स्थानिक उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता उघड्या डोळ्यांनी रस्त्याची दुर्दशा बघत असून, त्यांच्याकरिता नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे की स्वत:चे कमिशन, याबाबत नागिरकांमध्ये चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री येणार होते म्हणून चार दिवसांत डागडुजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेळघाटात १९ फेब्रुवारीला येणार होते. त्यांना रस्त्याची दुर्दशा दिसू नये, याकरिता तेव्हा चार ते पाच दिवसांत सार्वजनिक बांधकाम व कंत्राटदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. तो दौरा रद्द झाला. तेव्हापासून पुन्हा रस्ता दुरुस्तीचे काम अपूर्ण आहे. शहरातील चर्च, न्यायालय, हायस्कूल, प्रकल्प कार्यालय या ठिकाणी डागडुजी केल्यावरही गिट्टीची चुरी तशीच पडली आहे.
------------------------------------