पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

By Admin | Updated: October 25, 2014 22:32 IST2014-10-25T22:32:15+5:302014-10-25T22:32:15+5:30

यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे

Wait for white gold | पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. दिवाळी सण आला तरी कापसाचा मुहूर्त नाही. अशातच रबी हंगामातील हरभरा पेरणीत शेतकरी जवळील पैसा खर्च करून बसला आहे. त्यामुळे प्रकाश देणाऱ्या दिवाळीत आर्थिकबाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अंधारात गेल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
यंदा शेतीच्या हंगामात आजपर्यंतचा पावसाचा लहरीपणा शेती पिकांना प्रभावित करणारा ठरला आहे. कोरडवाहू खारपाणपट्ट्यात सध्या कापसाचा बोंड परिपक्व होत आहेत. त्यामुळे दिवाळीत यावर्षी अशा शेतकऱ्यांच्या घरी जुन्याच कापसाच्या वातीचे दिवे पेटविण्यात आले. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी यंदाचा कापूस आला नाही. शेतात अद्याप सीतादहीसुद्धा झालेली नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच पिकांसाठी वेगवेगळ्या बाबींवर आर्थिक खर्च करावा लागला. अशातच कपाशीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकाची फवारणी सुरू होती.
दुसरीकडे संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी कापसाला तुषार सिंचनाद्वारे पाणी देत होते. काही दिवसांनंतर पावसाचा फेर सुरू झाला. त्यामुळे कपाशी पिकाच्या मशागतची कामे ठप्प झाली. शेतीत पाणी साचले होते. डवरे व निंदण न झाल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. हे पावसाचे वातावरण संपताच कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. आता कपाशीची पाने लाल्यामुळे जळत आहेत.
आधीच खरीप हंगामातील पहिल्यांदाच उत्पादन देणाऱ्या मूग पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यानंतर सोयाबीन सवंगणी व तयार करण्याची कामे सध्या सुरू आहेत. मात्र वातावरणाचा फटका या पिकाला बसला आहे. शेंगातील दाणे साबुदाण्याच्या आकाराची असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनचे घटलेले उत्पादन व त्याला बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Wait for white gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.