वॅगन कारखाना निविदेत अडकला
By Admin | Updated: June 27, 2015 00:20 IST2015-06-27T00:20:02+5:302015-06-27T00:20:02+5:30
बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे.

वॅगन कारखाना निविदेत अडकला
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्रकल्पग्रस्त्यांच्या जमिनी ताब्यात
अमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे. गत आठ महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याने ती केंव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण यापूर्वीच करण्यात आले आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेला रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना तांत्रीक अडचणीतून बाहेर पडलेला नाही. मोठा गाजावाजा करुन या प्रकल्पाची प्रसिद्धी घेणारे नेते हल्ली कोठे गायब झालेत, हे कळेनासे झाले आहे. गत नऊ महिन्यांपासून या प्रकल्पाला निविदा प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने बेरोजगारांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची पायाभरणी करणार अशी माहिती पुढे आली होती. परंतु जून महिना संपायला आला असला तरी निविदा प्रक्रियाच आटोपली नसल्याची वास्तविकता आहे. रेल्वे विभागाने हा कारखाना निर्माण करण्याची जबाबदारी पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. या कारखान्याच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने खास करुन उपअभियंता मोहन नाडगे यांची नियुक्त ी केली आहे. हा कारखाना बडनेरा येथील पाचबंगला परिसरात साकारला जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कारखान्याचे भूमिपूजन होईल, असे संकेत रेल्वे विभागाने दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पेरणीपासून वंचित राहावे लागले अशी ओरड प्रकल्पग्रस्तांची आहे. दोन वर्षांपूर्वीच या कारखान्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असताना निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी एक ते दीड वर्षे लागत असतील तर हा कारखाना निर्माण करायला १० वर्ष लागतील काय? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी तैयब अली सैयद कादर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
६४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यात
प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी ५४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. १५ कोटी ३२ लाख रुपये प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पात २३ घरे तर १०९ लोकसंख्या बाधीत होणार आहे.
वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या भूमिपूजनाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावे, यासाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे. पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे या कारखान्याची निर्मिती, निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सोपविली आहे. किमान तीन निविदा येणे अपेक्षित आहे. काही तांत्रीक अडचणी आल्या असतील तर त्या त्वरेने सोडविल्या जातील.
- आनंदराव अडसूळ, खासदार.
रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या निविदा प्रक्रियेला उशीर होत आहे. परंतु पुढील महिन्यात ती पूर्ण होईल, असे संकेत आहेत. पटना रेल्वे बांधकाम विभागाकडे या कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे.
- मोहन नाडगे, उपअभियंता, रेल्वे.