अखेर वघाळवासीयांना मिळाले नवीन ट्रान्सफार्मर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:13+5:302021-03-18T04:13:13+5:30
आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष, सिंचनाअभावी फळे गळाल्याने नुकसान भरपाई मागणार वरूड : तालुक्यातील वघाळ येथील गेल्या आठवड्यापासून नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर ...

अखेर वघाळवासीयांना मिळाले नवीन ट्रान्सफार्मर
आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष, सिंचनाअभावी फळे गळाल्याने नुकसान भरपाई मागणार
वरूड : तालुक्यातील वघाळ येथील गेल्या आठवड्यापासून नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर चा प्रश्न अखेर १५ मार्चला निकाली निघाला. तातडीने ६३ केव्ही क्षमतेचे नवीन ट्रान्सफाॅर्मर लावण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
ट्रान्सफाॅर्मरअभावी वीजपुरवठा होत नसल्याने संत्राबागांना सिंचन कसे करावे, हा प्रश्न येथल्या शेतकऱ्यांना पडला होता. संत्री, मोसंबी बागांना सिंचनाअभावी फळगळती लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. वघाळ गावातील डीबी क्रमांक ६ च्या तक्रारी महावितरणच्या गाडेगाव कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी वारंवार केल्या होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त वीज जोडणी या डीबीवर असल्याने ऐन सिंचनकाळात सदर डीबीवरील ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफाॅर्मर निकामी झाल्याने हाहाकार उडाला होता. त्यात थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महावितरणने धडक मोहीम राबिवली. जोपर्यंत शेतकरी थकबाकी भरणार नाहीत, तोपर्यंत नवे ट्रान्सफाॅर्मर न बसविण्याचा हेका महावितरण कंपनीने मिरविला. परिणामी वीजपुरवठ्याअभावी कृषिपंप आठ दिवसांपासून बंद राहिल्याने सिंचनाअभावी संत्री व मोसंबीच्या बागांवरील फळगळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने शेतकरी आक्रमक झाले.
महावितरणच्या गाडेगाव कार्यालयावर धडक देऊन परिस्थितीचे गांभीर्य शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, अधिकारी थकबाकी रक्कम भरण्यावर अडून राहिले. अखेर वामनराव विंचूरकर, वासुदेवराव विंचूरकर, रामराव इंगळकर, नरसिंग शिंदे, यादवराव दळवी, साहेबराव जावळेकर आदींनी पुढाकार घेऊन थकीत वीज बिलांचा भरणा केला. त्यानंतरसुद्धा तीन दिवसांचा कालावधी लोटूनदेखील ट्रान्सफार्मर लागले नव्हते.
१४ मार्चला सायंकाळच्या सुमारास ६३ केव्हीचे ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आले व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. ‘लोकमत’नेही या घटनेचा पाठपुरावा सातत्याने केल्याबद्दल माजी सरपंच धनंजय विंचूरकर, अनंत दळवी, पराग लांगापुरे, नरसिंग शिंदे, भुमेश्वर वानखडे, विक्की आंजीकर, मुन्ना लष्करे, विनोद हरले आदींनी आभार मानले.
-----------
‘लोकमत’ची दखल, शेतकरी आक्रमक
थकबाकी भरूनही ट्रान्सफाॅर्मर न लागल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. ‘लोकमत’ने १४ मार्चला ‘डीबी दुरुस्ती करायला वीज अधिकाऱ्यांचा नकार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच वीज यंत्रणा खडबडून जागी झाली.
-----------
नुकसान भरपाई द्या ...!
आठ दिवसांपासून ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त असल्याने सिंचनाअभावी फळगळती मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, महावितरणने याबाबत नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा ग्राहक तक्रार मंचात जाण्याचा इशारा संत्राउत्पादक अनंत दळवी यांनी दिला आहे.