राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:27+5:302021-06-02T04:11:27+5:30
एप्रिलचे वेतन महिनाअखेर, शासनाकडून अनुदान विलंबाने येत असल्याची ओरड अमरावती : राज्य सेवेतील १९ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाची वानवा सुरू ...

राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची वानवा
एप्रिलचे वेतन महिनाअखेर, शासनाकडून अनुदान विलंबाने येत असल्याची ओरड
अमरावती : राज्य सेवेतील १९ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाची वानवा सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असला तरी वनविभागातील कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोना संसर्गात महापालिका, आरोग्य, पोलीस व महसूल विभाग वगळता अन्य विभागाचे कामकाज ठप्प होते. मात्र, राज्य शासनाने १ जूनपासून संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्याने २५ टक्के कर्मचारी कार्यालयात राहण्याचे निर्देश आहेत. परंतु, एप्रिल व मे महिन्याचे नियमित वेतन होत नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे. शासनाची आर्थिक घडी विस्कटल्याने वेतनासाठीचे अनुदान विलंबाने मिळत आहे. त्यामुळे गत दोन महिन्यांपासून वेतनाचे नियोजन काेलमडले आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची हीच स्थिती पुढे काही महिने राहील, असे संकेत आहेत. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, जलसंधारण, पाणीपुरवठा, अन्न व औषधी प्रशासन, प्रादेशिक परिवहन, राज्य परिवहन महामंडळ अशा ४२ विभागात दरमहा वेतनाची बोंबाबोंब आहे.
-------------
कोट
एप्रिल महिन्याचे वेतन २० मे रोजी झाले. मे महिन्याचे अद्यापही बिल पाठविण्यात आलेले नाही. कोरोना काळात विलंबाने वेतन होत आहे. शासनाकडून अनुदान उशिराने मिळत आहे.
- दामाेदर पवार, सरचिटणीस, राज्य कर्मचारी संघटना