वडाळीत देशी दारू विक्रीचे दुकान नकोच!
By Admin | Updated: November 18, 2014 22:46 IST2014-11-18T22:46:45+5:302014-11-18T22:46:45+5:30
स्थानिक वडाळी परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे देशी दारू विक्रीचे दुकान नकोच, अशी भूमिका महिला शक्तीने घेतली आहे. या दुकानासंदर्भात मतदान प्रक्रिया न करता

वडाळीत देशी दारू विक्रीचे दुकान नकोच!
अमरावती : स्थानिक वडाळी परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे देशी दारू विक्रीचे दुकान नकोच, अशी भूमिका महिला शक्तीने घेतली आहे. या दुकानासंदर्भात मतदान प्रक्रिया न करता ते हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी करण्यात आली.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या निवेदनात वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीच्या सदस्यांनी मागील दहा महिन्यांपासून बंद असलेले देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्याची मागणी केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी या दुकानाबाबत ‘बाटली आडवी की उभी’ यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली परंतु मतदार यादीतून अनेक महिलांची नावे गहाळ होती.
परिणामी ही मतदान प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करून त्यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी गोंधळ घातला होता. देशी दारू दुकानाच्या परवाना धारकाने राज्य उत्पादन शुल्क, महापालिका यांच्याशी संगनमत करून मतदान यंत्रणेत घोळ करण्यात यश मिळविले होते, असा आरोप महिलांनी केला होता. देशी दारू विक्रीच्या दुकानाबाबत आता कोणतीही मतदान प्रक्रिया न करता ते या भागातून कायमचे हद्दपार करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. वडाळीत पुन्हा देशी दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महिलांनी दिला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांना हे निवेदन सादर केले. यावेळी अनिता वानखडे, हर्षा राऊत, नीशा चव्हाण, ललिता आंबेकर, जिजाबाई गोफणे, शोभा खोडे, पुष्पा गुहे, संगिता आंबेकर, कल्पना वैद्य, मीना खडसे आदी उपस्थित होते.
याच मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पोलीस आयुक्त, फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आले. (प्रतिनिधी)