वडाळी येथील दारु दुकानाचा प्रश्न पेटणार!
By Admin | Updated: December 13, 2014 22:30 IST2014-12-13T22:30:59+5:302014-12-13T22:30:59+5:30
महापालिका प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या वडाळी येथे बंद असलेल्या देशी दारुविक्री दुकानाबाबत २८ डिसेंबर रोजी नव्याने मतदान घेतले जाणार आहे. बाटली आडवी की उभी?

वडाळी येथील दारु दुकानाचा प्रश्न पेटणार!
अमरावती : महापालिका प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या वडाळी येथे बंद असलेल्या देशी दारुविक्री दुकानाबाबत २८ डिसेंबर रोजी नव्याने मतदान घेतले जाणार आहे. बाटली आडवी की उभी? हे महिलाशक्तीच्या हाती असून प्रशासन त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेईल. मात्र हे दारुचे दुकान सुरु होऊच नये, असा आक्रमक पवित्रा काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्या महिलांनी घेतला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा मतदान होणार आहे.
वडाळी येथे प्रभू झांबानी यांचे परवाना असलेले देशी दारुचे दुकान आहे. मात्र या दुकानामुळे वडाळीत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्यात आले. मात्र मतदार यादीत घोळ असल्यामुळे अनेक महिला मतदारांची नावे यादीत नव्हती. परिणामी ही मतदान प्रक्रिया दारु विक्रेत्याच्या इशाऱ्यावर ‘मॅनेज’ करण्यात आली, असा आरोप वडाळीत देशी दारु विक्री विरोधात असलेल्या आंदोलकांनी केला होता. ही मतदान प्रक्रिया नकोच, दुकानही सुरु होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत त्यावेळी वडाळीत महिलाशक्ती एकवटली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पुढील आदेशापर्यत देशी दारु विक्रीचे दुकान सुरु करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र १० महिन्याचा कालावधी लोटला असताना दुकानासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असा अर्ज देशी दारु विक्रीचे परवानाधारक झांबानी यांनी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाकडे केला होता. शासनाच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही पोहचली आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रिया राबविण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परवाना धारक झांबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महापालिका प्रशासनाला दारु विक्री दुकानासंदर्भात मतदान घेण्याचे कळविले असल्याची माहिती न्यायालयात सादर केली. त्यामुळे महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना केल्यात. त्यानुसार आयुक्तांनी न्यायालयात हजर राहून मतदान प्रक्रिया राबविण्याबाबतचे प्रतीज्ञापत्र लिहून दिले आहे. दारुची बाटली आडवी की उभी. याबाबत येत्या २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी मतदान राबविण्याबाबत रितसर कार्यक्रम घोषीत केला जाणार आहे. चार हजार महिला मतदार असलेल्या यादीनुसार पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. वडाळीत बाटली आडवी की उभी? हा निर्णय महिलांच्या हाती राहणार आहे. देशी दारु विक्रेता परवानाधारक शासन, प्रशासन स्तरावर सर्वच घटनाक्रम आपल्या बाजुने कसे होईल, याचे सुक्ष्म नियोजन करीत असल्याचे चित्र आहे.परंतु ज्या हक्कासाठी महिला एकवटल्या आहेत, त्यांच्या पाठीशी पुरुषवर्ग उभा राहतो काय? हे २८ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)