वडाळी- पोहरा जंगलाच्या अभयारण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: June 12, 2017 00:20 IST2017-06-12T00:20:24+5:302017-06-12T00:20:24+5:30
शहरालगतच्या वडाळी- पोहरा, मालखेड जंगल हे वनसंपदने नटलेले आहे. शुद्ध हवेसह वाघ, बिबट, हरिण अन्य वनप्राणी,

वडाळी- पोहरा जंगलाच्या अभयारण्याचा प्रस्ताव
वनमंत्री सकारात्मक : सुनील देशमुखांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरालगतच्या वडाळी- पोहरा, मालखेड जंगल हे वनसंपदने नटलेले आहे. शुद्ध हवेसह वाघ, बिबट, हरिण अन्य वनप्राणी, पशुंचा येथे वावर असतो. या जंगलाचा अभयारण्यात समावेश करावा, अशी मागणी आ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात ठेवला. असाच प्रस्ताव आमदारांनी ठेवावा, ही बाब निश्चितच सुखावणारी असून त्याअनुषंगाने वडाळी- पोहरा जंगलास अभयारण्याचा दर्जा कसा मिळेल, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल, अशी ग्वाही वनमंत्र्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ४ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ना. मुनगंटीवार बोलत होते. आ. सुनील देशमुखांनी वडाळी, पोहरा जंगलाची महती सांगताना या जंगलात सुरु असलेले अवैध धंदे, क्रशर मशीन बंद करणे गरजेचे असल्याची बाब उपस्थित केली. वडाळी, पोहरा जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव अगोदरच पाठविण्यात आला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता माझ्या स्तरावर वडाळी, पोहरा जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. वडाळी, छत्री तलावाचे सौंदर्र्यींकरण वाढविताना येथे प्राणीसंग्रहालय सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली. आ. अनिल बोंडे यांनी वृक्ष लागवडीनंतर चराई होऊ नये, यासाठी प्रत्येकी वृक्षांच्या सभोवताल खोल दरी निर्माण करावे, ट्री गार्ड, ठिंबक सिंचन सारखी व्यवस्था वृक्षसंवर्धनासाठी करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, वन सचिव विकास खारगे, मुख्य वनसंरक्षक प्रकाश चव्हाण, विशेष पोलीस महानिरिक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे आमदार, अधिकारी आदी यंत्रणा उपस्थित होती.