धामणगावात मतदारांनी दाखविले चातुर्य
By Admin | Updated: October 19, 2014 23:14 IST2014-10-19T23:14:27+5:302014-10-19T23:14:27+5:30
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला, देशात सत्तांतर झाले. लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या लाटेचा परिणाम संभवणार असा अंदाज

धामणगावात मतदारांनी दाखविले चातुर्य
अमरावती : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला, देशात सत्तांतर झाले. लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या लाटेचा परिणाम संभवणार असा अंदाज बांधला जात होता. अमरावती जिल्ह्यापुरता विचार केल्यास येथेही मोदींची लहर भाव खाऊन गेली हे लक्षात येते. चार जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. परंतु ज्या अरूण अडसड यांच्या प्रचारार्थ खुद्द मोदींनी चांदूररेल्वेत सभा घेतली, त्या अडसडांचा मात्र निसटता का होईना, पराभव झाला. भाजप श्रेष्ठींना जिव्हारी लागणारा हा पराभव म्हणावा लागेल. या पराभवाचे अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून अरूण अडसड ओळखले जातात. भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढताना भाजपने त्यांच्यावर विश्वास दर्शविला. त्यांना उमेदवारी दिली. अडसडांचा विजय पक्षासाठीही गरजेचा होता. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन चांदूररेल्वे येथे करण्यात आले. मोदींची ही सभा नेहमीप्रमाणेच यशस्वी ठरली. मोदींची लाट लक्षात घेता धामणगावातही सत्तांतर घडून येणार, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु ऐनवेळी परिस्थिती पालटली आणि अवघ्या ९७४ मतांनी अरूण अडसड यांचा पराभव झाला. मोदींची सभा झाल्याने वलयांकित ठरलेली अरूण अडसड यांची उमेदवारी अनेक अर्थांनी वैशिष्टयपूर्ण होती. परंतु काँग्रेसच्या वीरेंद्र जगतापांनी त्यांचा पराभव केला. यावरून चांदूररेल्वे मतदारसंघात ‘मोदी फॅक्टर’चा प्रभाव पडला नाही, असाही काढला जात आहे. तर दुसरीकडे जगताप यांनी केलेल्या विकासकामांनाच येथील जनतेने प्राधान्य दिले असा दुसरा एक सूरही उमटत आहे. स्थानिक मतदार सदसदविवेकबुध्दीने मतदान करून योग्य त्या व्यक्तिला निवडून आणू शकतोे, असाही सूर उमटत आहे.