मेळघाटातील आदिवासींचा स्वेच्छा पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग
By Admin | Updated: May 18, 2016 00:10 IST2016-05-18T00:10:25+5:302016-05-18T00:10:25+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे.

मेळघाटातील आदिवासींचा स्वेच्छा पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग
वन्यपशु घेणार मोकळा श्वास : अंबाबरवामध्ये वाहताहेत बदलाचे वारे
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे. त्यांना जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.
अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा अभयारण्य आहे. १७ एप्रिल १९९७ रोजी अंबाबरवा जंगल परिसराला अभयारण्याच्या दर्जा देण्यात आला होता. सन २००० मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तर २००६ अतिसरंक्षित गाभाक्षेत्रात समावेश करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्याचे क्षेत्र आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, अस्वल, कोल्हा, गवा, सांबर भेडकी, ससा, उदमांजर हे प्राणी आहेत. मोर, हरोळी, नाचन, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, पिंगळा, रातवा यांचासह २०० चे वर पक्षी असून फुलपाखरे व इतर कीटकांसह येथील जैवविविधता समृध्द आहे.
अंबाबरवा गावाने याच माध्यमातून एक नवा पायंडा पडण्याचा प्रयत्न केला. स्वेच्छा पुनर्वसन हा प्रयोग आता मेळघाटसारख्या भागात रुजला आहे. अंबाबरवाचे पुनर्वसन ३ नोव्हेंबर १०१२ च्या शासन निर्णयाच्या विकल्प १ नुसार होत आहे. १० मे २०१५ रोजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी अचनक भेट देऊन पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट कली.
२८ एप्रिल २०१६ ला अंबाबरवा गावात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी बैठक घेतली. सम २००८ पासून पुनवर्सन रखडलेले असताना ही बैठक मोलाची ठरली. ३ मे २०१६ रोजी गावातील संपूर्ण २९८ लाभार्थ्यांना बँकेचे पासबुक देण्यात आले. आदिवासी समुदायातील लोकांना अंबाबरवा सारख्या दुर्गम गावातून अकोटला येणे गैरेसोयीचे होते. म्हणून पहिल्यांदाच गावातच थेट बँक आॅफ इंडियाची चमू पोहोचली. बँकेच्या चमूतील व्यवस्थापक कुमार व रोखपाल सांगळूदकर यांनी गावातील लोकांना थेट पैसेवाटप केले. प्रमाणपत्र व पासबुक वाटप पंचायत समिती सभापती पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य, वासुदेव गावंडे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दातीर, सदस्य नलिनी गावंडे, माजी सभापती घामोडे, उपाध्यक्ष हागे, सहाय्यक वनसरंक्षक विनोद डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांनी केले. ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनवर्सन योजनंतर्गत लवकरच गाव सोडणार असल्याचे सांगितले आहे. आजवर कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु.), सोमठाणा (खु.), केलपाणी व चुनखडी एकूण १५ गावांचे पुनवर्सन झालेले आहे. अंबाबरवा अभयारण्यातील रोहिनखिडकी गाव सुध्दा आता ऐच्छिक पुनर्वसन प्रक्रियेत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना आता जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.