व्हीएनआयटी करणार ‘थर्ड पार्टी आॅडिट’

By Admin | Updated: September 14, 2016 00:13 IST2016-09-14T00:13:38+5:302016-09-14T00:13:38+5:30

स्थानिक अंबा -एकवीरा देवी मंदिर परिसरातील नाल्यावरील विकास कामाचे 'थर्ड पार्टी आॅडिट' करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

VNIT to 'Third Party Audit' | व्हीएनआयटी करणार ‘थर्ड पार्टी आॅडिट’

व्हीएनआयटी करणार ‘थर्ड पार्टी आॅडिट’

आयुक्तांचे पत्र : अंबा-एकवीरा मंदिर परिसरातील बांधकाम 
अमरावती : स्थानिक अंबा -एकवीरा देवी मंदिर परिसरातील नाल्यावरील विकास कामाचे 'थर्ड पार्टी आॅडिट' करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी नागपूर येथील व्हीएनआयटीच्या संचालकांशी सोमवारी पत्रव्यवहार केला आहे.
अंबा -एकवीरा देवी मंदिर परिसरातील अंबानाल्यावरील बांधकामाचे 'थर्ड पार्टी आॅडिट'साठी एजंसी नियुक्त करावी, असे पत्र भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी १६ आॅगस्टला प्रशासनाला दिले होते. त्याअनुषंगाने आयुक्तांनी व्हीएनआयटीच्या संचालकांना पत्र पाठवून त्यांची वेळ आणि तपासणी शुल्काबाबत विचारणा केली. अंबानाल्यात स्लॅब टाकून तेथे पार्किंग व्यवस्था प्रस्तावित होती. मात्र अद्यापपर्यंत हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. उलटपक्षी अंबानाल्यात टाकलेल्या आणि अर्धवट स्थितीत असलेल्या कॉलममुळे परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागते. या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचीही ओरड आहे. त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण कामाचे त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण करण्यात यावे, याबाबत अनेक आमसभांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आलेत.
नगरविकास विभागाच्या ३० मार्च २०११ च्या शासन निर्णयान्वये तीर्थक्षेत्र विकासांतर्गत श्री अंबादेवी व एकवीरादेवी परिसराच्या विकासासाठी ३९७.९७ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. पहिल्या टप्प्यात २ कोटी ४७ लाख २२ हजार ५३६ रुपयांची निविदा प्रक्रिया करून सदर काम संजय कन्स्ट्रक्शन परतवाडा यांना देण्यात आले. त्यानुसार १६० मीटर लांबी व ११ ते १३ मीटर रुंदीचे स्लॅब टाकून अंबानाल्यावर पार्किंग व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. १६० मीटर लांबीपैकी सुरुवातीचे २० मीटर सोडून पार्किंग व्यवस्था तयार करण्यात आली. यात गांधीचौक ते एचव्हीपीएम या रस्त्याला परपेंडीक्युलर होणारा अप्रोच प्रस्तावित होता. परंतु त्या रस्त्यावर असणारी वाहतूक व पार्किंगकरिता येणारी वाहने, संभाव्य कोंडी या मुद्याचा सखोल अभ्यास करून प्रस्ताव बनविण्यात आला नाही. त्यामुळे २० मीटर अप्रोच स्लॅब थांबविण्यात आला.
सांडपाण्यासोबत अंबानाल्यात कचरा वाहून येतो. २-३ पावसाळ्यात वाहनतळाच्या कॉलम आणि चेंबरला कचरा अडून या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अंबानाल्यातील कॉलमला कचरा अडकल्याने वाहणाऱ्या पाण्याची पातळी वाढून नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे उघड झाले. त्यावर आमसभेत अनेकदा रणकंदण झाले. तत्कालीन शहर अभियंत्यावर यात भ्रष्टाचाराचे नानाविध आरोप केले गेले. सरतेशेवटी या कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करण्याच्या निष्कार्षाप्रत प्रशासन पोहोचले. उल्लेखनीय म्हणजे, सदर कामाची किंमत ५० लाखांपेक्षा अधिक असल्याने स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक होते. तीन-चार वर्षांत आॅडिटच्या नावावर केवळ राजकारण करण्यात आले. थर्ड पार्टी आॅडिट झाल्यास आपलेही अंडे-पिल्ले बाहेर येतील, अशी भीती अनेकांना होती. त्यामुळे थर्ड पार्टी आॅडिटला जोरकस विरोधही झाला. त्या विरोधाला न जुमानता आणि तुषार भारतीय यांच्या पत्राची दखल घेत 'थर्ड पार्टी आॅडिट' करण्यास आयुक्तांनी हिरवी झेंडी दिली आहे. (प्रतिनिधी)

आयुक्तांकडून व्हीएनआयटीशी पत्रव्यवहार
अंबा -एकवीरा देवी मंदिर परिसरातील विकास कामाचे 'थर्ड पार्टी आॅडिट' करण्याबाबत आयुक्त हेमंत पवार यांनी १२ सप्टेबरला नागपूरस्थित व्हीएनआयटीच्या संचालकांना पत्र लिहिले आहे.२.४७ कोटी रुपयांपैकी १.८१ कोटी रुपये बांधकामावर खर्च झाले असून प्रकल्पाचे थर्ड पार्टी आॅडिट आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. थर्ड पार्टी आॅडिटचे शुल्क भरण्यास महाालिका तयार असून आपण याबाबत भेटीचा दिनांक आणि शुल्क विवरण विनाविलंब कळवावे, असे आयुक्तांनी या पत्रात म्हटले आहे.

Web Title: VNIT to 'Third Party Audit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.