महापालिका आयुक्तांची बडनेरा जुन्या वस्तीला भेट
By Admin | Updated: July 4, 2015 00:58 IST2015-07-04T00:58:59+5:302015-07-04T00:58:59+5:30
जुन्या वस्तीतील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकवरून अनेकजण घसरुन पडले.

महापालिका आयुक्तांची बडनेरा जुन्या वस्तीला भेट
पेव्हिंग ब्लॉकची पाहणी : धोकादायक स्थळाकडे विशेष लक्ष
बडनेरा : जुन्या वस्तीतील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकवरून अनेकजण घसरुन पडले. त्यापासून गंभीर इजादेखील झाली. त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवार ३ जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आले होते. जुन्या वस्तीच्या कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिर समोरच्या रस्त्यावर दूरवरपर्यंत मागील चार महिन्यांपूर्वी पेव्हिंग ब्लॉक लावण्यात आले आहे. पेव्हिंग ब्लॉकच्या वळणावर अनेक वाहन चालक तसेच सायकलस्वार घसरुन पडलेत.
आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाले आहे. एकाच्या कमरेला शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. धोकादायक ठरणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार बडनेऱ्यात आले होते. परिसरातील लोकांनी पेव्हिंग ब्लॉकमुळे होणाऱ्या त्रासाची गाऱ्हाणी आयुक्तांसमोर मांडली व हे धोकादायक ब्लॉक तत्काळ हटविण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे कंपासपुरा हा भाग उताराचा आहे. या भागातून रामनाला गेला आहे. तो गाळाने बदबद भरला असतो. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचून राहत असल्याचे आयुक्तांना सांगितले. बऱ्याच घरांमध्येदेखील पाणी शिरते. याची दखल घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. यावेळेस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी, शहर अभियंता जीवन सदार, सहायक आयुक्त योगेश पिठे, अतिक्रमणाचे योगेश कुत्तरमारे, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुळकर्णी, शेखर शिवराम कुळकर्णी, नगरसेविका जयश्री मोरे, विजय नागपुरे, प्रभाकर केने, लिलाधर ठवकर, ज्ञानेश्वर बांते, प्रकाश बांते, विनोद कानतोडे आदी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)