विधिमंडळाच्या ‘एसटी’ कल्याण समितीचा दौरा

By Admin | Updated: September 10, 2016 00:21 IST2016-09-10T00:21:05+5:302016-09-10T00:21:05+5:30

विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा नियोजित दौऱ्याची माहिती जि.प. प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

Visit of the Legislature 'ST Welfare Committee' | विधिमंडळाच्या ‘एसटी’ कल्याण समितीचा दौरा

विधिमंडळाच्या ‘एसटी’ कल्याण समितीचा दौरा

जिल्हा परिषद : १९ ते २१ सप्टेंबरला जिल्हा दौरा
अमरावती : विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा नियोजित दौऱ्याची माहिती जि.प. प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही समिती येत्या १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात दाखल होणार आहे. १५ आमदारांचा समावेश असलेली ही समिती जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जि.प. प्रशासनाने यासाठी प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. यापूर्वी या समितीचा दौरा ७ ते ९ जुलैदरम्यान होणार होता. मात्र त्यावेळी २७ जूनला विधिमंडळ सचिवालयाने अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नियोजित दौरा पुढे ढकलल्याचे लेखी संदेश जि.प. प्रशासनाला पाठविला. त्यामुळे प्रशासनाचाही ताण हलका झाला आहे. परंतु आता पुन्हा समितीचा दौरा धडकल्याने जि.प. प्रशासनात धडकी भरली असून समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर तयारी सुरू झाली आहे.
पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर आता राज्य विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जि.प.चे विविध विभाग अलर्ट झाले आहेत. या समितीचे प्रमुख म्हणून आ. रूपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात समितीचे सदस्य आ. अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्कल धनारे, प्रभुदास भिलावेकर, संजय पुराम, काशिराम पावरा, चंद्रकात सोनवणे, वैभव पिचड, पांडूरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे व चंद्रकात रघुवंशी आदी १५ जणांचा समितीत समावेश आहे. बुधवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही समिती विश्रामगृहात दाखल होणार आहे. त्यांतर सकाळी ९ ते १० यावेळेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसमवेत अनुुसुचित जमातीच्या कल्याणकारी योजना व अडचणीबाबत अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, व अनुशेष, जातपडताळणी विषयक बाबी तसेच आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अनुसुचित जमातींच्या कल्याणकारी योजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. याशिवाय विद्युत वितरण कंपनी, पोलीस आयुक्त शहर, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील भरती, बदली, आरक्षण व अनुशेष आदी विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. असा कार्यक्रम आहे. (प्रतिनिधी)

२० सप्टेंबरला कामांची पाहणी
अनुसूचित जमाती कल्याण समितीचे पदाधिकारी जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतिगृह व यंत्रणानिहाय केलेल्या कामांची पाहणी करणार आहे. यात आदिवासी क्षेत्रात उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनाबाबत केलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

२१ ला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने तीन दिवसीय दौऱ्यात घेतलेल्या आढावा बैठकीत आढळून आलेल्या त्रुटी तसेच आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या त्रुटीसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.

Web Title: Visit of the Legislature 'ST Welfare Committee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.