राजकीय नेत्यांच्या बंद घराला भेटी!
By Admin | Updated: July 6, 2016 00:19 IST2016-07-06T00:19:51+5:302016-07-06T00:19:51+5:30
अंजनगाव सुर्जी शहरातील काठीपुरा भागात एकाच कुटुंबातील कर्त्या पुरुषासह सहा जणांनी २८ जूनला आत्महत्या केली.

राजकीय नेत्यांच्या बंद घराला भेटी!
सामूहिक आत्महत्या प्रकरण : सीआयडी चौकशीसाठी प्रयत्नांची गरज
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहरातील काठीपुरा भागात एकाच कुटुंबातील कर्त्या पुरुषासह सहा जणांनी २८ जूनला आत्महत्या केली. या प्रकरणाला सहा दिवस उलटून गेले. तरी मात्र पोलिसांच्या हातात कुठलाच सुगावा लागला नाही. परंतु घडलेल्या घटनेनंतर राजकीय नेत्यांची सांत्वना करण्यासाठी दररोज ये-जा सुरू असून बंद असलेल्या मृतकाच्या घराला भेट देऊन नेते परत जातात. मात्र प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशा सूचना एकाही नेत्याने पोलिसांना दिल्या नसल्याने आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तर हे नेते येत नसतील ना, अशी सर्वसामान्य नागरिकात चर्चा आहे.
२८ जूनला प्रफुल्ल चव्हाण या कुटुंब प्रमुखासह एक भाऊ, दोन बहिणी आणि दोन भाच्या अशा सहा जणांनी मोनोक्रोटोफास हे विषारी औषध घेऊन सामूहिक आत्महत्या केली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वातील चमूने सहाही मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
प्राथमिक अंदाजानुसार तोंडातून फेस येत असल्याने आणि मोनोक्रोटोफॉसचे डब्बे मृतदेहाजवळ असल्याने हे सामूहिक आत्महत्या असल्याचा निष्कर्ष निघाला. परंतु एखादे विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्या सहाही जणांना काही वेदना झाल्या नसतील काय, विषारी औषध प्राशन केल्यानंतर बिछाण्यावरची उशीही सरकू नये, हातापायाच्या काहीही हालचाली होऊ नये, यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करीत असून एकाच कुटुंबातील सहा सामूहिक आत्महत्या अशा गंभीर प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजूनही प्राप्त होऊ नये आणि लोकचर्चेतून येणाऱ्या घटनेसंदर्भात पोलीस स्टेशनला जाऊन प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात विचारपूस न करता परस्पर बंद दरवाजा आणि चुलतभाऊ याची भेट घेऊन राजकीय नेते जात असल्याने राजकीय नेते भेटीचा फार्स करीत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
यांनी दिल्या भेटी
आतापर्यंत गणमान्यांसह लोकप्रतिनिधींनी चव्हाण यांच्या बंद घराला भेटी देऊन पाहणी केली. बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, अमरावती बाजार समिती सभापती सुनील वऱ्हाडे, बबलू देशमुख, केवलराम काळे, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, काचनमाला गावंडेंचा समावेश आहे.