विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:41+5:302021-03-13T04:22:41+5:30
अमरावती : राज्य शासनाने कोरोना संसर्गामुळे रविवारी, १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुन्हा पुढे ...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
अमरावती : राज्य शासनाने कोरोना संसर्गामुळे रविवारी, १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करीत गुरुवारी दुपारी ४ वाजता येथील पंचवटी चौकात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन पुकारले. काही वेळ वाहतूक ठप्प झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलनाला उग्र स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यावेळी माजीमंत्री अनिल बोंडे यांच्यासह २३ विद्यार्थ्यांना डिटेन करून सोडण्यात आले.
एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतन समाेर विद्यार्थ्यांनी शासनविरोधात जोरदार नारे लावले. दरम्यान संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार तंत्रनिकेतन ते पंचवटी चौक दरम्यान विद्यार्थी पायी चालत गेले. पंचवटी चौकात चक्काजाम आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार नारेबाजी करीत मागण्यांकडे लक्ष वेधले. पोलीस घटनास्थळी पाेहोचले आणि विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचा विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू करताच धावपळ सुरू झाली. यात आघाडीवर असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात १९ मुले, तर चार मुलींना डिटेन करून सोडण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनासाठी गाडगेनगर पोलीस, एसआरपीएफ, क्यूआरटी पथक तैनात होते.
----------------
अनिल बोंडे म्हणाले, चोरमले ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी चौकात पुकारण्यात आलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना डिटेन करून पोलीस व्हॅनमधून नेले जात होते. यावेळी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे हे घटनास्थळी पाेहोचले. पोलीस व्हॅनमधून नेण्यात येणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बोंडे हे व्हॅनचे दार उघडण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा एका पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना मज्जाव केला आणि अनिल बाेंडे आक्रमक झाले. विद्यार्थी हे स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहे, असे बोंडे म्हणाले. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हे पोलीस व्हॅनजवळ पोहोचले. त्यानंतर अनिल बोंडे आणि आसाराम चोरमले यांच्या शाब्दिक वाद सुरू झाला. कोरोना काळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे चोरमलेंना म्हणाले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेले जात असताना महिला पोलीस सोबत नाही, ते काही चोर नाहीत, असा मुद्दा बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असे बोंडे म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. तेव्हा बोंडे हे चोरमले यांना ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ असे एक नव्हे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे आणि चोरमले यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ झाली. त्यानंतर ठाणेदार चोरमले यांनी बोंडे यांना पोलिसांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यात.
-----------------
एमपीएसीच्या परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात, या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने रस्ता आंदोलन करण्यात आले. अगोदरच चार ते पाच वेळा या परीक्षा पोस्टपोन झाल्या आहे. मात्र, पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. मुलींना पांगविण्यासाठी काठ्या फेकून मारल्यात. पोलीस व्हॅनमधून आरोपींसारखे नेण्यात आले. ही बाब अन्यायकारक आहे.
- अक्षय नरगळे, आंदोलक विद्यार्थी.
--------------------
कोरोना काळात आरोग्य, रेल्वे, एनसीबीसी, फार्मसीच्या परीक्षा झाल्या, तर एमपीएसीच्या का नाही? याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी संवैधानिक मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांनी दहशतवादी असल्यासमान वागणूक दिली. लाठीमार करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
-किरण मोरे, आंदोलक विद्यार्थी.
-------------