तृतीयपंथीयांच्या दोन गटात हिंसक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:22 IST2017-03-03T00:22:40+5:302017-03-03T00:22:40+5:30
होळीच्या पार्श्वभूमीवर ‘फगवा’ मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात गुरूवारी हिंसक चकमक झाली.

तृतीयपंथीयांच्या दोन गटात हिंसक चकमक
पोलीस ठाण्यात तणाव : समज देऊन सोडले
अमरावती : होळीच्या पार्श्वभूमीवर ‘फगवा’ मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात गुरूवारी हिंसक चकमक झाली. हा वाद विकोपाला जात असताना काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता दोन्ही गटांनी फगवा अर्थात वर्गणी मागावी, असा तोडगा काढण्यात आला. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी दुपारी सुमारे दोन तास हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू होता. दरम्यान एका तृतीयपंथीयाला शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गट परस्परांसमोर उभे ठाकले. हा संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी सहायक आयुक्तांच्या सोबतीला कमांडोंना पाचारण करावे लागले. मागील दोन दिवसांपासून हा वाद धुमसत होता.
पोलीस सूत्रांनुसार, तृतीयपंथी दरवर्षी होळीच्या पर्वावर शहरातील बाजारपेठ आणि नागरी वस्त्यांमध्ये फिरून वर्गणी गोळा करतात. बुधवारी स्थानिक बेलपुरा परिसरात तृतीयपंथियांचा एक गट ढोल वाजवित फिरत असताना साबणपुरा भागातील तृतीयपंथीयांच्या अन्य एका गटाने त्यांना बेदम मारहाण केली. बेलपुऱ्यातील तृतीयपंथियांनी दीक्षा घेतली असून त्यांनी ढोलक वाजवून नव्हे तर कटोरा वाजवून फगवा गोळा करायला हवा.
कोतवाली ठाण्याची मध्यस्थी
अमरावती : मात्र, ते ढोलकी वाजवून वर्गणी अर्थात फगवा मागत असल्याचा आरोप साबणपुरा येथिल तृतीयपंथियांच्या एका गटाचा आहे. त्यावर दोन्ही गट बसस्थानक परिसरात परस्परांसमोर उभे ठाकले. यादोन्ही गटात हिंसक चकमक झाली. याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.त्यापाठोपाठ गुरुवारी बेलपुरा येथिल एक गट शहर कोतवाली पोलिसांमध्ये पोहोचला व त्यांनी साबणपुरा भागातील तृतीयपंथियांच्या गटावर आरोप केलेत. साबणपुरा येथिल गटाने आपल्याला बेदम मारहाण करुन दागिने हिसकावल्याचा आरोप केला.
बेलपुऱ्यातील तृतीयपंथियांचा ‘तो’ गट शहर कोतवाली पोलीस ठाण्यात अधिक आक्रमक झाला. त्याचवेळी साबणपुरा भागातील २० ते २५ तृतीयपंथी शहर कोतवालीत पोहोचले. दोन गट परस्परांसमोर आल्याने दोन्ही गटातील तृतीयपंथी एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत. अगदी पोलीस ठाण्यासमोर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. न्याय न मिळाल्यास राजकमल चौकात आत्मदहन करु, असा इशारा एका गटाने दिल्याने तणावात भर पडली. दुपारी २ च्या सुमारास हा वाद विकोपाला जात असतानाच बेलपुरा भागातील गटाला योगेश नामक व्यक्ती दिसला.त्याला पाहताच ५० च्यावर तृतीयपंथी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. तृतीयपंथियांचा मोठा गट पाहून योगेश नामक ती व्यक्ती शहर कोतवाली समोरच्या खेळण्याच्या दुकानात शिरली. मात्र, तेथे त्याला गाठून त्याचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत दोन्ही गटातील सदस्यांना ताब्यात घेतले व ठाण्यात आणले. तृतीयपंथियांचा एकही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सरतेशेवटी नगरसेविका राधा कुरील यांनी शहर कोतवाली गाठून मध्यस्थी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसीपी नरेंद्र गायकवाड आणि पोलीस निरीक्षक निलिमा आरज शहर कोतवालीत दाखल झाल्यात. त्यांनी परिस्थिती हाताळली. (प्रतिनिधी)