नियमांचे उल्लंघन, अधिकाऱ्यांचे अभय
By Admin | Updated: July 17, 2014 23:49 IST2014-07-17T23:49:40+5:302014-07-17T23:49:40+5:30
कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत, तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे.

नियमांचे उल्लंघन, अधिकाऱ्यांचे अभय
दुर्लक्ष : कृषी केंद्रात साठा, किंमत, तारखेचा फलक बंधनकारक
गजानन मोहोड - अमरावती
कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत, तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे. या नियमांना सर्रास तिलांजली देऊन बहुतांश केंद्रांमध्ये अवाजवी किमतीत वाण विकले जात आहेत. परंतु कृषी अधिकाऱ्यांचे या बेकायदा व्यवहारावर नियंत्रण नाही.
दुकानात विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे दुकानदारांना बंधनकारक आहे. या परवान्यामध्ये विक्रीस्थळ व गोदामाचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे. परवाना नमूद असलेल्या विक्रीस्थळा- व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरुन बियाण्यांची विक्री करणे तसेच नमूद गोदामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी साठवणूक करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदीचा भंग आहे. विक्री केंद्रातून विक्री केली जाणाऱ्या बियाण्यांचा पिकनिहाय व वाणनिहाय तपशील, उत्पादकांचे नाव, उत्पादकाला कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची दिनांक इत्यादी तपशील विक्रेत्याने सही शिक्यानिशी कृषी विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. ज्या उत्पादकांचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे त्यांना कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी दिलेली परवान्याची प्रत व प्रमाणित बियाण्यांसाठी लॉटनिहाय मुक्तता अहवाल तसेच उत्पादन कंपनीच्या पैदासकाराने स्वाक्षरी केलेले वाणांचे ओळखता येणारे गुणधर्म ही कागदपत्रे विक्री केंद्रावर उपलब्ध ठेवणे ही परवानाधारकाची जबाबदारी आहे.