विनोद शिवकुमारचा जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:12+5:302021-04-11T04:13:12+5:30
परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने शुक्रवारी वकिलांमार्फत अचलपूर ...

विनोद शिवकुमारचा जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज
परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने शुक्रवारी वकिलांमार्फत अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर १५ एप्रिल रोजी युक्तिवाद होणार आहे.
गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याला दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी पळून जात असताना नागपूर रेल्वे स्थानकाहून २७ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला धारणी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पूर्वी दोन व नंतर एक अशा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची ३० मार्च रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून विनोद शिवकुमार अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. विनोद शिवकुमारच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी अचलपूर येथील तदर्थ व जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. के. मुनगीनवार यांच्या न्यायालयात शुक्रवारी अर्ज सादर केला. यावर आता सरकारी पक्ष व तपास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १५ एप्रिल ही तारीख ठेवण्यात आली आहे. आरोपीचे वकील व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून विनोद शिवकुमारच्या जामिनावर न्यायाधीश निर्णय देतील.