नदी काठावरील गावे ३६ वर्षांपासून उपेक्षित

By Admin | Updated: October 17, 2015 00:10 IST2015-10-17T00:10:09+5:302015-10-17T00:10:09+5:30

तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.

The villages on the river banks neglected for 36 years | नदी काठावरील गावे ३६ वर्षांपासून उपेक्षित

नदी काठावरील गावे ३६ वर्षांपासून उपेक्षित

शासनाने राबवाव्यात कायमस्वरूपी उपाययोजना : दररोज असुरक्षिततेत काढतात दिवस
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.लालफितशाहीच्या चक्रव्युहात अडकलेल्या या गावांमध्ये विकासाची पहाट कधी उजाडणार, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इतर धरणग्रस्त गावांना मदत, तर मग आम्हीच वाऱ्यावर का, हा सवाल या गावातील अन्यायग्रस्तांनी केला आहे़
सन १९७९ मध्ये महापूर आला होता़ यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तालुक्यातील चार गावांचे पुनर्वसन झाले होते़या गावातील ग्रामस्थ अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. पुराचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज, बोरगाव-धांदे, बोरगाव निस्ताने, विटाळा या चार गावांना बसला होता. वर्धा व चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे ही गावे उद्ध्वस्त झाली होती़ त्यात चार जणांचा मृत्यू व कोट्यवधी रूपयांची हानी झाली होती. तत्कालीन पुनर्वसनमंत्री शरद पवार यांनी १९८३ मध्ये या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती़ तद्नंतर या चारही गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत.
तालुक्यातून वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा, अशा नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले वाहतात़ या नाल्यांच्या काठी ग्रामस्थांचे वास्तव्य आहे़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली बोरगाव धांदे, विटाळा यांना गावांना पुराचा फटका बसतो.

प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्न
धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज हे पूरग्रस्त पुनर्वसित गाव विकासापासून कोसो दूर आहे़ येथे रस्ते नाल्या नाहीत. बाजार ओटेदेखील नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ रात्र काढतात. चंद्रभागा नदीला रात्री पूर आल्यास कधीही पुराचे पाणी घरात शिरून धान्य ओले होऊन दुसऱ्या दिवशी दोन वेळचे अन्नही या पुनर्वसिताना मिळत नाही़ दरवर्षी शेतजमीन खरडून जाते. शासनदरबारी हेलपाटे घेऊनही योग्य तो मोबदला मिळत नाही़ सार्वजनिक भवन, व्यापारी संकु ल या गावात नाही़ शाळेला संरक्षण भिंत नाही. ग्रामपंचायत भवनाची इमारत कधी तयार होणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामपंचायतीने वारंवार विकासासंदर्भात ठराव घेऊन ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सादर केलेत. परंतु कागदीघोडे नाचविण्याखेरीज अन्य कोणताही विकासाचा पर्याय काढला जात नाही़ हीच अवस्था इतर पूरग्रस्त पुनर्वसितांची झाली आहे़

१६ बाय ९० चौरस फुटांच्या घरात संसार
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ जून १९८७ साली सोळा बाय नव्वद चौरस फूट आकारातील घराचे बांधकाम करण्याकरिता तर शेतमजुरांना ३० बाय ९० स्केअर फूट प्लॉट देण्यात आले़ आज या गावातील ग्रामस्थांसाठी केवळ निवासाची व्यवस्था आहे़ परंतु शासनाने त्यावेळी कबूल केल्याप्रमाणे १७ नागरी सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. या पुनर्वसित वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुरविल्या गेल्या असत्या तर या गावांचा चेहरा-मोहरा बदलला असता़ परंतु लालफितशाहीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या पुनर्वसित वस्त्यांमधील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या सुविधा या गावांमध्ये मिळालेल्या नाहीत.

धामणगाव तालुक्यात वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा या नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले आहेत़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली, बोरगाव धांदे, विटाळा तसेच वर्धा नदीच्या काठावरील गावे अस्त्विाची लढाई लढत आहेत. दरवर्षी नुकसानीचे प्रमाण अधिक व मदत अल्पच मिळत असल्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाविरूध्द नाराजी व्यक्त केली आहे़ आता नव्या शासनाकडून तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे़ आतापर्यंत न्याय न मिळाल्याने येथील नागरिक कसेबसे जीवन जगत आहेत. आता मात्र, मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- सुधाकर पांडे, सरपंच, निंभोरा राज.

Web Title: The villages on the river banks neglected for 36 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.