भाडोत्री गुंडांना गावकऱ्यांनी पिटाळले
By Admin | Updated: October 7, 2014 23:26 IST2014-10-07T23:26:06+5:302014-10-07T23:26:06+5:30
सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना

भाडोत्री गुंडांना गावकऱ्यांनी पिटाळले
सांडपाण्याचा वाद : आठ हल्लेखोरांसह तीन गावकरी जखमी
चांदूरबाजार : सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच एकजूट करून गावकऱ्यांनी या गुंडांना पिटाळून लावले. यात आठ भाडोत्री गुंड जखमी झालेत. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कुरळपूर्णा येथे घडली.
येथील वॉर्ड क्र.१ मध्ये शे. नईम त्यांची पत्नी शबाना अंजुुम व बहिणीसोबत राहतो. त्याच्या शेजारीच पत्नीची मोठी बहीण शकीला परवीनचे घर आहे. या दोन्ही कुटुंबात रस्त्यावरील नालीच्या सांडपाण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी १ वाजता शे. नईमचे तोंडगाव येथील सासुरवाडीतील मंडळी अचानक कुरळपूर्णा येथे धडकली. लगेच अमरावती येथील लालखडी भागातील सासुरवाडीतील अन्य नातलगदेखील लाल रंगाच्या सुमो एमएच २१-सी-२१४३ या गाडीने कुरळपूर्णा येथे पोहोचले. या सर्व नातलगांनी शेख नईम यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोन कुटुंबातील भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शे. जाकीर शे. बशीर (२३),अ. कलाम शे.हमीद (३४), शे.मुबीन शे. सत्तार(३२ सर्व रा. कुरळपूर्णा) यांच्यावर चाकुने हल्ला चढविला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. शेख नईम यांच्या घरावर बाहेरून आलेल्या २० ते २५ जणांनी हल्ला चढविल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी एकत्र आले. ग्रामस्थांनी एकजूूट करून हल्लेखोरांना पळवून लावले. शेवटी हल्लेखोर जंगलाने पळू लागले. गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. गावकऱ्यांच्या मारहाणीत दुल्लेखाँ मियाखाँ (६०), हाफीजखाँ दुलेखाँ(३०), रियाज खाँ दुलेखाँ, मोहसीन खाँ दुलेखाँ (३० रा. लालखडी, अमरावती) व अ. शकील अ. कदीर (३२ रा. तोंडगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यातील १५ आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेची माहिती चांदूरबाजार पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन १२ जणांविरुध्द भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)