जिल्ह्यात गावोगावी आज जंतनाशक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:08+5:302021-09-21T04:15:08+5:30
अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे. बालके व पौगंडावस्थेतील मुलांच्या ...

जिल्ह्यात गावोगावी आज जंतनाशक मोहीम
अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे. बालके व पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून दोन जंतनाशक मोहिमा घेतल्या जातात. त्यानुसार उद्या या मोहिमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तरावर होणार आहे. कोविड-१९ मार्गदर्शक सूचना अवलंबून मोहीम राबविण्यात येणार आहे. एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा मोहिमेचा उद्देश आहे. २१ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. २९ सप्टेंबरला मॉप अप दिन असून, शाळाबाह्य किंवा घरी असलेल्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. एका वर्षाखालील बालकांना जंतनाशक गोळी देऊ नये. १ ते २ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझोलची अर्धी (२०० मि.ग्रॅ.) गोळी, दोन ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक (४०० मि.ग्रॅ.) गोळी, ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक ४०० मि.ग्रॅ. गोळी देण्याची आरोग्य विभागाची सूचना आहे. मोहीम राबविताना काही गुंतागुंत झाल्यास त्वरित आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.