कुपोषणमुक्तीसाठी गावनिहाय ‘अॅक्शन प्लॅन’
By Admin | Updated: November 9, 2014 22:24 IST2014-11-09T22:24:59+5:302014-11-09T22:24:59+5:30
मेळघाटच्या कुपोषण मुक्तीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार, सिंचन, पशुपालन, पुनर्वसन, अंगणवाडींना पायाभूत सुविधा आदींवर भर देत गावनिहाय ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी

कुपोषणमुक्तीसाठी गावनिहाय ‘अॅक्शन प्लॅन’
अधिकाऱ्यांची हजेरी : पालक सचिवांची आढावा बैठक
अमरावती : मेळघाटच्या कुपोषण मुक्तीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार, सिंचन, पशुपालन, पुनर्वसन, अंगणवाडींना पायाभूत सुविधा आदींवर भर देत गावनिहाय ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे नवनियुक्त प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण परदेशी यांनी आढावा बैठक घेतली. ढेपाळलेल्या आरोग्य सेवेबाबत परदेशींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
शासकीय विश्राम भवनात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य वनसंरक्षक संजय गौड, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक दिनेश त्यागी, आदिवासी विकास विभागाचे धारणी येथील प्रकल्प अधिकारी संजय मीना, रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, सामाजिक कार्यकर्त्या पौेर्णिमा उपाध्याय, बंड्या साने, किशोर रिठे, रवी पाटील आदी उपस्थित होते.
परदेशी यांनी विभागनिहाय योजनांची माहिती जाणून घेतली. अनुदानाची कमतरता, अपूर्ण कामे कशी पूर्ण करता येतील, याची माहिती त्यांनी घेतली. यंदा सोयाबीन, कपाशी हे पीक हातून गेल्याचे परदेशी यांना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा पीक उत्पादनक्षमता गतवर्षीपेक्षा सरासरी ५० टक्के इतकीच आहे. त्यामुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले असले तरी रबी पिकांची टक्केवारी वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परदेशी यांनी दिलेत. आत्मा, केम प्रकल्प एकमेकांशी जोडून अधिकाअधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश त्यांनी दिले.