कुंड खुर्द गावात अग्नितांडव, आठ घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:39 IST2018-04-27T22:39:27+5:302018-04-27T22:39:27+5:30
भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द येथे गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत आठ घरे भस्मसात झाली. यामध्ये पाळीव पशूंसह दुकानही जळाले. आ. रवि राणा यांनी आपद्ग्रस्तांची शुक्रवारी भेट घेतली.

कुंड खुर्द गावात अग्नितांडव, आठ घरे खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द येथे गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत आठ घरे भस्मसात झाली. यामध्ये पाळीव पशूंसह दुकानही जळाले. आ. रवि राणा यांनी आपद्ग्रस्तांची शुक्रवारी भेट घेतली.
कुंड खुर्द येथील रहिवासी विठ्ठल शिवराव रंगारी यांच्या गोठ्याला सर्वप्रथम आग लागली. यानंतर आगीने तब्बल आठ घरांमध्ये धुडगूस घालून ती घरे भस्मसात केली. यामध्ये विठ्ठलराव रंगारीसह दादाराव बोरकर, अशोक बोरकर, नामदेव गजभिये, दामोदर मेश्राम, बबन हरणे, सुखदेव सुर्वे, बकुबाई बोरकर यांच्या घरांचा समावेश आहे. आगीत घरातील संपूर्ण भांडीकुंडी व धान्य जळाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. आगीची माहिती वलगाव पोलीस ठाणे तसेच महसूल प्रशासनाला देण्यात आली. फायर ब्रिगेडने घटनास्थळी पोहोचून आग विझविली.
दरम्यान, शुक्रवारी आ. रवि राणा यांनी कुंड खुर्द येथे भेट देऊन आगग्रस्तांचे सांत्वन केले तसेच उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना प्रत्यक कुटुंबाला एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळवून देण्याची सूचना केली. याप्रसंगी जि.प. सदस्य मयूरी कावरे व पं.स. सदस्य प्रदीप थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
४० बकऱ्या होरपळून मृत
घराच्या आवारात असलेल्या गोठ्यांना आगीने वेढल्याने ४० बकऱ्या तसेच गाई-म्हशीसह इतर जनावरे आगीत होरपळून ठार झाली. एका कुटुंबाच्या किराणा दुकानाची राख झाली.
विठ्ठल रंगारी यांनी गोठ्यात ठेवलेल्या रॉकेलच्या दिव्याने तेथील वस्तूंनी पेट घेतला आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. - दुर्गेश तिवारी, ठाणेदार, वलगाव