श्रेयवादात अडकली 'विकास गंगोत्री'
By Admin | Updated: March 29, 2017 00:16 IST2017-03-29T00:16:06+5:302017-03-29T00:16:06+5:30
डीआरडीएचे विकासगंगोत्री हे प्रदर्शन श्रेयवादात अडकले आहे. राजकीय नेत्यांकडून दबाव येत असल्याने ...

श्रेयवादात अडकली 'विकास गंगोत्री'
१० लाखांचा निधी परत जाणार : आयोजनाचा पत्ता नाही, निधी परतीच्या मार्गावर
अमरावती : डीआरडीएचे विकासगंगोत्री हे प्रदर्शन श्रेयवादात अडकले आहे. राजकीय नेत्यांकडून दबाव येत असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याबाबत अद्यापही कुठलाच निर्णय घेऊ शकलेली नाही.
३१ मार्चपर्यंत ही प्रदर्शनी न झाल्यास १० लाखांचा निधी परत जाण्याची नामुष्की डीआरडीएवर येणार आहे.
महिला बचतगटांच्या उद्योगांना चालना मिळावी, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत विकास गंगोत्रीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा ही प्रदर्शनी चांदूररेल्वे येथे घेण्यात यावी, असा आ.वीरेंद्र जगताप यांचा आग्रह आहे. दुसरीकडे ही प्रदर्शनी अमरावतीतच व्हावी, असा प्रस्ताव भाजपा नेत्यांचा आहे. त्यामुळे दोन नेत्यांच्या श्रेयवादात या कार्यक्रमाचे नियोजन अडकून पडले आहे. त्यामुळे शासनाकडून या प्रदर्शनीसाठी मिळालेल्या सुमारे १0 लाख रूपयांचा खर्च येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत न झाल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महिला सक्षमीकरणाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता विकासगंगोत्री प्रदर्शनी दरवर्षी जिल्हास्तरावर आयोजित केली जाते. गतवर्षी विभागस्तरावरील विकास गंगोत्री प्रदर्शनी अंबानगरीत पार पडली होती. याकरिता २५ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यंदाही जिल्हास्तरीय विकासगंगोत्रीसाठी दहा लाख रूपयांच्या निधीतून विकास प्रदर्शनीसाठी प्रशासनाने प्रशासकीय तयारी चालविली होती. मात्र, ही प्रदर्शनी अमरावतीतच व्हावी, असा आग्रह एका भाजपा नेताचा आहे. दुसरीकडे ही प्रदर्शनी चांदूररेल्वे येथे घेण्यात यावी, यासाठी आ.जगताप आग्रही आहेत. त्यामुळे या प्रदर्शनीबाबत दोन नेत्यांचे वेगवेगळे मत पुढे येत असल्याने प्रशासन मात्र कोंडीत अडकले आहे. परिणामी विकासगंगोत्रीच्या प्रदर्शनीचे नियोजन रखडून पडले आहे. नेत्यांच्या श्रेयवादात प्रशासनाने मात्र मौन बाळगून ही फाईल बंद करून ठेवली आहे. त्यामुळे प्रदर्शनीसाठी असलेला दहा लाखांचा निधी अखर्चित राहून तो शासनाकडे परत जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व भानगडीत मात्र महिला बचतगटांना प्रदर्शनीच्या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
मार्चची घाई आहे हे खरं आहे. मागील वर्षीही प्रदर्शनीच्या निधीला शासनाने मुदतवाढीची परवानगी दिली होती. यंदाही मुदतवाढीसाठी सचिवांना विनंती केली. ग्रामीण भागालाही झुकते माप द्यावे, चांदूररेल्वे येथे प्रदर्शनीसाठी पालक म्हणून पालकमंत्र्यांना विनंती करू.
- वीरेंद्र जगताप, आमदार, चांदूररेल्वे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेत साडेतीन महिन्याचा कालावधी निघून गेला. मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनी असल्यामुळे ही प्रदर्शनी घेता आली नाही. आता मार्च अखेर असल्याने विकासगंगोत्री होऊ शकली नाही.
- क्रांती काटोले,
प्रकल्प संचालक, डीआरडीए