तळेगावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

By Admin | Updated: October 24, 2015 00:12 IST2015-10-24T00:12:32+5:302015-10-24T00:12:32+5:30

यादव काळातील हेमाडपंथी पुरातन विहिरी दगडांच्या भिंती, देवालयांचे नक्षीयुक्त दगडी खांब, पुष्कर्णा पायऱ्याची विहीर ....

View of Hindu-Muslim unity in Talegaon | तळेगावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

तळेगावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

जागृत देवस्थान : पीरशहा लतीफ दर्गा अन् तीन हेमाडपंथी शिवालयांची वैशिष्ट्ये
आदर्श

धामणगाव रेल्वे : यादव काळातील हेमाडपंथी पुरातन विहिरी दगडांच्या भिंती, देवालयांचे नक्षीयुक्त दगडी खांब, पुष्कर्णा पायऱ्याची विहीर अशा विविध वास्तुंसाठी विख्यात असलेल्या तळेगाव दशासर येथे हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन घडविणारा पीरशहा लतीफ यांचा दर्गा, हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे़
तळेगाव दशासर गाव अतिशय पुरातन असून यादव काळातील तीन हेमाडपंथी शिवायल येथे आहेत़ ही मंदिरे दगडांनी बांधली असून काळाच्या ओघात ही मंदिरे शिकस्त झाली आहेत़ केशव मंंदिर आणि लोहारपुऱ्यातील मशिद दगडी चिऱ्यांनी बांधले होते़ पीरशहा लतीफ यांचा दर्गा यादव काळानंतर बांधण्यात आला आहे़ विदर्भातील लाखो मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असणाऱ्या या दर्ग्यात ऊर्स मोठ्या जल्लोषात साजरा होतो़ पीरशहा दर्ग्याची वास्तू अतिशय प्रेक्षणीय आहे़ वास्तूच्या व्यवस्थेसाठी दानदात्यांनी त्यांची जमीन दर्ग्याला दान दिली आहे़ शहा लतीफ पिरांचे वंशज या जमिनीचा उपयोग करतात.
इ़स़१६३४ मध्ये महाजन बादशहाने वऱ्हाडचे सुवे ठरवून प्रांताची निर्मिती केली. त्यावेळी लतीफ पीर यांची कीर्ती त्यांच्या कानी पडली़ त्यांनीच दर्ग्याची सुंदर वास्तू उभारण्याच्या कामात लक्ष घातले, असे शहा लतीफ यांचे वंशज चिराग यांनी त्याकाळी सांगितले होते. त्यांनी इनामाची सनदसुध्दा पूर्वीच दाखविली होती. सनदेचा कागद आज काळाच्या ओघात जीर्ण झाला आहे़ या दर्ग्यात कुराणाची एक प्रत असून ती सुंदर हस्ताक्षरात आणि कुलाकुसरीने बनविण्यात आली आहे़ आज तो कागद जरी जीर्ण दिसत असला तरी काळ्या, हिरव्या, सोनेरी शाईने लिहिलेली ही प्रत आहे़
अखिल भारतीय काँग्रेसच्या नागपूर येथे भरलेल्या १३ व्या अधिवेशनात ही प्रत ठेवण्यात आली होती़
पीर सदसमरत यांचा दर्गा गावाच्या मध्यभागी मुख्य मार्गावर मोठ्या आवारात असून दर्ग्याची बांधणी २०० वर्षांपूर्वीची आहे़ गावात लहान मोठ्या कबरी बांधण्यात आल्या आहेत़ तळेगावात मुस्लिम बांधवाची संख्या ३ हजारांच्या आसपास आहे. गावातील सर्व मुस्लिम बांधव सुशिक्षित आहेत . दोन्ही धर्मातील नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहातात. गावात कधीही ताणतणाव होत नाही. गावात सुशिक्षीत नागरिकांची मोठी फळी आहे.
त्यापैकी काही डॉक्टर, वकील फिजिशीयन, व्यावसायिक आणि जमिनदार आहेत. काही मोठे जमिनदारही आहेत. त्यांची तळेगावच्या विकासासाठी काम करण्याची तळमळ आहे. तळेगावच्या विकासामध्ये गुलाम अहमद हुसेन, रहुब हुसेन, मधुकर बनसोड, बापूराव देशमुख यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम नागरिकांचा हातभार आहे.

जाती-धर्माच्या राजकारणापलीकडे
एकीकडे जाती-पाती आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण केली जाते. एकमेकांचे जीव घेतले जातात. सारे राजकारणच जाती-धर्माच्या द्वेषामुळे बरबटून गेले आहे. अशा स्थितीत तळेगावात मात्र आजही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारा दर्गा आणि शिवालये एकत्र नांदत आहेत. ना येथे कोणता वाद आहे ना द्वेष आहे. परधर्माचा आदर करण्याचे बाळकडूच जणू येथील नागरिकांना मिळाले आहे, असे वाटते.

Web Title: View of Hindu-Muslim unity in Talegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.