विदर्भाचे नंदनवन पावसात माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 13:25 IST2017-09-01T13:23:40+5:302017-09-01T13:25:05+5:30
विदर्भाची चेरापुंजी.. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असणारे चिखलदरा यंदा पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात माघारले आहे.

विदर्भाचे नंदनवन पावसात माघारले
अमरावती : विदर्भाची चेरापुंजी.. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असणारे चिखलदरा यंदा पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात माघारले आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट आहे. टक्केवारीत चिखलदरा १४ तालुक्यांत १० व्या स्थानी आहे. साहजीकच याचा थेट परिणाम पर्यटकांवर झाला आहे. यंदा तुरळक दिवस वगळता चिखलदºयाने धुक्याची चादर पांघरलीच नाही.
जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस चिखलदºयात पडतो. एक जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या दिवसांत येथे १५२६ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे.तर ३० आॅगस्ट पर्यत ११८५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. ही ६३ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ५३ टक्के इतका पाऊस आतापर्यंत पडला आहे. याउलट मागील वर्षी या तारखेला १२४१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७६६ मिमी पाऊस कमी पडला आहे.
मेळघाटात पावसाची दुसरी ओळख असनारा धारणी तालुका देखिल यंदा पावसाच्या सरासरीत माघारला आहे. आज तारखेपर्यत पावसाची ११८५ सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५८७.९ मिमी पाऊस पडला. ही ६३.२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १०८८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदा ५००.५ मिमी पाऊस जास्त होता.
तिवसा तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस
अपेक्षित सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ८३.१ टक्के पाऊस तिवसा तालुक्यात पडला आहे. चांदूर रेल्वे ८०.७, वरूड ७९.८, मोर्शी ८४.४, चांदूर बाजार ७३.२, नांदगाव खंडेश्वर ७१.३, धामणगाव रेल्वे ७०.८, दर्यापूर ६८.२, अमरावती ६४.३, चिखलदरा ६३.६, भातकुली व धारणी ६२.२, अचलपूर ५७.७ तर सर्वात कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.