छोटे राज्य साकारल्यास विकासात विदर्भ पहिला
By Admin | Updated: September 21, 2014 23:44 IST2014-09-21T23:44:33+5:302014-09-21T23:44:33+5:30
प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या

छोटे राज्य साकारल्यास विकासात विदर्भ पहिला
अमरावती : प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या छोट्याशा राज्याची संकल्पना साकारली गेल्यास देशात विदर्भ पहिल्या क्रमांकाचे सक्षम राज्य म्हणून उदयास येईल, असे मत छत्तीसगड या छोट्या राज्याची विकासात्मक संकल्पना मांडणाऱ्या अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जनमंच विदर्भाचा लढा या संघटनेतर्फे ‘छोट्या राज्याची निर्मिती’ या विषयावर आयोजित परिसंवादात हनुमंत यादव, जवाहर सूरशेट्टी, एस. एस. ब्राह्मणकर सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छत्तीसगड योजना आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. हनुमंत यादव यांनी जगातील छोट्या देशाचा विकास झाल्याचे सांगून छोट्या राज्याच्या संकल्पनेतच सक्षम विकास दडलेला असल्याचे सांगितले. छोट्या राज्यातच सामान्य जनतेला सुयोग्य सुविधा, चांगल्या प्रशासनात त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, असेही यादव म्हणाले. राज्याच्या विकासासाठी भौगोलिक क्षेत्र ९० हजार किलोमीटरपेक्षा अधिक नसायला पाहिजे. यामध्ये मध्यप्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगड राज्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विदर्भदेखील अशा भौगोलिक क्षमतेमध्ये येत असल्याने तेथे छोटे राज्य सक्षम राज्याची संकल्पना पूर्ण होण्याचा विश्वास हनुमंत यादव यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगडने १० वर्षांत राज्य विकास दर १२ टक्क्यापर्यंत पोहोचविला आहे. या विकासाबाबत देशात छत्तीसगड राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून नावारूपास आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध समित्यांवरील शिक्षण सल्लागार (छत्तीसगड) जवाहर सुरशेट्टी म्हणाले, पूर्वी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये समानता होती. मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्य म्हणून उदयास आले. औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात मोठा विकास करू शकले. विदर्भ अखंड महाराष्ट्रातच राहून अखंड विकासाच्या बाबतीत मागे राहिला. वेगळ्या विदर्भातच सक्षम विकास दडला असल्याचे त्यांनीही सांगितले.
विदर्भ हा प्रदेश जगाच्या मध्यभागी, केंद्रस्थानी येतो. भविष्यात विदर्भाला विकासात्मक मोठा वाव आहे. छोट्या राज्याच्या संकल्पनेत त्याचा विदर्भालाच मोठा फायदा होईल.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. विदर्भात विकासाचे परिवर्तन पाहिजे असल्यास वेगळ्या विदर्भाच्या सक्षमतेतच ते दडलेले आहे, असे मत कृषी उद्योजक एस. एस. ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, अतुल यादगिरे, अतुल गायगोले, विजय विल्हेकर, वसूसेन देशमुख, गजानन कोरे, दीपक जोशी, संजय वानखडे, विवेक राऊत, चेतन पाटील व जनमंच विदर्भाचा लढा याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)