'व्हिक्टर'चे मध्यरात्री 'आॅल आऊट आॅपरेशन'

By Admin | Updated: October 24, 2016 00:06 IST2016-10-24T00:06:23+5:302016-10-24T00:06:23+5:30

शहरातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था रूळावर आणण्याच्या उद्देशाने सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी मध्यरात्री...

'Victor' midnight 'All Out Operation' | 'व्हिक्टर'चे मध्यरात्री 'आॅल आऊट आॅपरेशन'

'व्हिक्टर'चे मध्यरात्री 'आॅल आऊट आॅपरेशन'

मध्यरात्रीनंतर गस्त : डीसीपी, एसीपी, पीआय रस्त्यावर, गुन्हेगारांवर करडी नजर
अमरावती : शहरातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था रूळावर आणण्याच्या उद्देशाने सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी मध्यरात्री शहरात आकस्मिक 'आॅल आऊट आॅपरेशन' राबविले. गस्तीदरम्यान वॉकीटॉकीवर पोलीस आयुक्तांचा संदेश आल्यास व्हिक्टर कॉलिंग असे संबोधले जाते.
पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा रस्त्यावर उतरल्याने अमरावतीकरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने शनिवारी मध्यरात्री सीपी दत्तात्रय मंडलिक यांच्यासह पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, चेतना तिडके, बळीराम डाखोरे यांच्या नेतृत्वात ‘आॅपरेशन' ला सुरुवात झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पथक तसेच दहा ठाण्यातील पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी
अमरावती : सीपींच्या आदेशाने शहरातील विविध ठिकाणी नाकांबदी करून वाहनांची तपासणी केली. अनेक वाहन चालकांजवळ वाहनांची कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या ठिकाणांची तपासणी करून या व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली. यामध्ये एका ठिकाणी अवैध दारू बनविण्याचे रसायन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी रेकार्डवरील काही आरोपींची चौकशी केल्यानंतर पाच जणांना ताब्यात सुद्धा घेतले.
संपूर्ण शहरभर मध्यरात्री अशी आकस्मिक कारवाई करण्यात आल्याने पोलीस विभागाने संपूर्ण रात्र जागून काढली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांसह अवैध वाहतूक व विना परवाना वाहतुकदारांचे धाबे दणाणले होते. यासर्व घडामोडींचा आढावा पोलीस आयुक्तांनी वॉकीटॉकीवरून घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य ते निर्देश दिलेत. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी स्वत: शहरातील विविध मार्गांवर गस्त घातली.
त्यांनी सर्वप्रथम रात्री सुरूअसलेले व्यापारी प्रतिष्ठानांसह हॉटेल, ‘रेस्टॉरेंट अ‍ॅन्ड बार’ बंद करण्याचे आदेश दिलेत. नागपुरी गेट चौक परिसरात वाहनांच्या तपासणीकडेही सीपींनी लक्ष दिले. त्यानंतर पंचवटी चौक, राजापेठ, वेलकम पॉर्इंट आदी ठिकाणी गस्त घालून ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा आढावा घेतला.
पोलीस आयुक्तांच्या अशाप्रकारच्या कारवाईमुळे मध्यरात्री नियमबाह्य कामे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलीस आयुक्तांच्या या मोहिमेचे अंबानगरीवासी कौतुक करीत आहेत.

दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयी ‘अटॅच’
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गस्तीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वॉकीटॉकीवर संपर्क साधून आवश्यक ते निर्देश दिलेत.सीपींनी डीसीपी झोन २ यांचे अंगरक्षक मनीष नशिबकर यांच्याशी अनेकदा संपर्क केला मात्र, ते वॉकीटॉकीवर उपलब्ध झाले नाहीत. त्याचप्रमाणे नागपूरी गेट ठाण्यातील वायरलेस वॉकीटॉकी सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आशा बरडे यांच्याशी सुद्धा पोलीस आयुक्तांनी वॉकीटॉकीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही त्या उपलब्ध झाल्या नाहीत. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांनी दोघांनाही पोलीस मुख्यालयात गार्ड ड्युटीवर तैनात केले आहे.

अशी झाली मध्यरात्री कारवाई
पोलीस आयुक्त मंडलिक यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या ‘आॅल आऊट आॅपरेशन’मध्ये विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांनी १६ तडिपारांची तपासणी केली. त्यामध्ये गुन्हे शाखेचे पीएसआय प्रवीण वेरुळकर, प्रवीण पाटील यांच्या पथकाने तपासणी केली असता मध्यरात्री ३ ते पहाटे ५ वाजताच्या सुमारास तडिपार मोहम्मद फारुक त्याच्या घरीच आढळून आला. त्याच्यावर कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे ३० गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ११० वाहनांची कागदपत्रे तपासली. त्यामध्ये २१ वाहनांवर पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई केली. पोलिसांनी २२ हॉटेल्स व धाब्यांची तपासणी केली. त्यामध्ये मुंबई दारुबंदी कायद्यान्वये ३ गुन्हे नोंदविण्यात आलेत.

गुन्हेगारीवर अंकुश रहावा, यासाठी 'आॅल आऊट आॅपरेशन राबविण्यात आले. अर्ध्या-अधिक पोलीस यंत्रणेद्वारे वाहनाची तपासणी,नाकांबदी, गुन्हेगारांची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त

Web Title: 'Victor' midnight 'All Out Operation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.