पीडित मुलगी बयाण देण्यास अद्यापही असमर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:01:02+5:30
लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही.

पीडित मुलगी बयाण देण्यास अद्यापही असमर्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मदरशातील लैंगिक अत्याचारपीडित मुलगी अद्यापही मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही. त्यामुळे तिचे बयाण पोलिसांनी नोंदविले नाही. तिच्या बयाणानंतर या प्रकरणातील रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. मंगळवारपर्यंत पोलिसांनी मरदशातील कर्मचारी व मुली असे १५ जणांचे बयाण नोंदविले आहेत.
लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. फिरदौसची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. १३ नोव्हेंबर रोजी तिची पोलीस कोठडी संपणार आहे. जियाउल्ला खानची पोलीस कोठडी संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पीडित मुलीचे बयाण अद्यापपर्यंत नोंदविले नाही, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खानच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली.
पीडित मुलीचे बयाण व्हायचे आहे. ती बयाण देण्यास मानसिकदृष्ट्या अद्यापही असमर्थ आहे. तिच्या बयाणानंतर नवीन बाबी समोर येऊ शकतात. त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी करण्यात येईल. मुख्य आरोपी १५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट.