फळगळतीने घेतला संत्रा उत्पादकांचा बळी

By Admin | Updated: September 17, 2014 23:28 IST2014-09-17T23:28:49+5:302014-09-17T23:28:49+5:30

संत्रा फळगळतीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्रा उत्पादकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून त्याचा पहिला बळी चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी येथील काशिनाथ निकम हा संत्रा उत्पादक ठरला आहे.

Victim of orange growers taken by fruit | फळगळतीने घेतला संत्रा उत्पादकांचा बळी

फळगळतीने घेतला संत्रा उत्पादकांचा बळी

वयोवृध्द शेतकऱ्याची आत्महत्या : कोल्हाडी येथील घटना
चांदूरबाजार : संत्रा फळगळतीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्रा उत्पादकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून त्याचा पहिला बळी चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी येथील काशिनाथ निकम हा संत्रा उत्पादक ठरला आहे. या संत्रा उत्पादकाने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
काशिनाथ किसनराव निकम (६५,रा. कल्होडी, सर्फापूर) यांनी स्वबळावर शेती घेऊन त्यावर संत्राबाग उभी केली. पत्नी, सुना, नातवंडांचे मोठे कुटुंब या बागेवर उपजिविका भागवित होते. बागेच्या देखभालीसाठी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आंबिया बहराच्या विक्रीतून आलेल्या पैशातून बँकेच्या कर्जाचा भरणा करणे व उरलेल्या पैशातून अन्य खर्चाचे नियोजन त्यांनी केले होते. दरम्यान संत्रा फळांना गळतीचा रोग लागला. प्रचंड गळतीमुळे निम्म्यापेक्षा अधिक संत्राफळे जमीनदोस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. आता झालेले नुकसान भरून निघणार नाही, अशी भावना काशिनाथ यांची झाली.
यातून सावरण्यासाठी त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा होती. शासन यंत्रणेकडून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.
मात्र, या मोबदल्याची रक्कम नेमकी किती व केव्हा मिळणार? याबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याच चिंतेमध्ये त्यांनी शेतातील झाडाला दुपट्टा बांधून गळफास घेतला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काशिनाथ निकम यांना सन २०१० मध्ये सेवासंस्थेकडून उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Victim of orange growers taken by fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.