विद्यापीठांच्या परीक्षांबाबत कुलगुरूंची ऑनलाईन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:55+5:30
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी परीक्षा, ‘कोरोना’ उपाययोजना, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर ना. सामंत यांनी चर्चा केली. ते मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत कुलगुरूंची ऑनलाईन बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ आहे. परिणामी राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये बंद असून, उन्हाळी परीक्षा रखडल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी परीक्षा, ‘कोरोना’ उपाययोजना, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर ना. सामंत यांनी चर्चा केली. ते मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
२४ मार्च ते १४ एप्रिल या दरम्यान ‘लॉकडाऊन’ आहे. त्यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी निगडित महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र, उन्हाळी २०२० परीक्षा अद्यापही झाल्या नाहीत. काही विद्यापीठांनी उन्हाळी परीक्षांचे कॅलेंडर तयार केले असताना ‘लॉकडाऊन’मुळे ते पुढे ढकलावे लागले. उन्हाळी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधीत आवश्यक आहे. दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सिलॅबस अपूर्ण असल्याची बाब ना. सामंत यांच्या पुढ्यात विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मांडली. दरम्यान ‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी विद्यापीठांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयांवर ना. उदय सामंत यांनी कुलगुरूंकडून माहिती जाणून घेतली. कुलगुरूंसोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीचा गोषवारा ना. सामंत हे मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. त्यानंतरच विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल निर्णय घेतील, अशी माहिती आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यात उन्हाळी परीक्षा, नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठांची भूमिका आदींबाबत माहिती जाणून घेतली. विशेषत: परीक्षांवर फोकस होता. राज्यपाल यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे बैठकीतून स्पष्ट झाले.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
परीक्षा होणारच
४विद्यापीठ आणि महाविद्यालयात परीक्षेबाबत असलेला संभ्रम आता संपुष्टात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थगित परीक्षा पुढे घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 'लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या नियोजनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा रद्द होणार नसून त्या विलंबाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यपाल यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार आहे.