पशुवैद्यकीय विभाग जोरात
By Admin | Updated: January 8, 2017 00:10 IST2017-01-08T00:10:45+5:302017-01-08T00:10:45+5:30
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अलीकडे कात टाकली असून हा विभाग मोकाट श्वान व इतर गुरांना अटकाव घालण्यात यशस्वी ठरला आहे.

पशुवैद्यकीय विभाग जोरात
५६२१ श्वानांचे निर्बिजिकरण : मोकाट जनावरांना अटकाव
अमरावती : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अलीकडे कात टाकली असून हा विभाग मोकाट श्वान व इतर गुरांना अटकाव घालण्यात यशस्वी ठरला आहे. महापालिकेने एप्रिल २०१६ ते ५ जानेवारी २०१७ या कालावधीत १११२ पेक्षा अधिक मोकाट जनावरांना बंदिस्त करून संबंधित पशुपालकांकडून ३ लाख ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पशुवैद्यकीय विभागांतर्गत येणाऱ्या श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाअंतर्गत १९ मे २०१६ ते ५ जानेवारी २०१७ या कालावधीत ५६ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. नर श्वान व मादी श्वानाच्या निर्बिजिकरण शस्त्रक्रियेचे गुणोत्तर ३५-६५ असे आहे.
शहरातील कुठल्याही रस्त्यावर मोकाट जनावरे दिसू नयेत, अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
२५ जानेवारी 'डेडलाईन'
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पशू नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. ७ दिवसांत २४९ वराहांची नोंदणी करण्यात आली असून संबंधित वराहधारकांकडून ७,४०० नोंदणी शुल्क घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नोंदणीकृत वराहांचे पालन त्यांच्या मालकामार्फत करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. पाळीव श्वान, गाई, म्हशी, घोडे, शेळी, मेंढी इत्यादींचा परवाना वजा नोंदणी करण्याच्या सूचना वजा आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.
- तर फौजदारी कारवाई
नोंदणीकृत नसलेल्या जनावरांना मालक नाही, असे गृहित धरून अशा जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी दिल्या आहेत. विनापरवानगी पशुपालन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना पशूवैद्यकीय विभागाला आयुक्तांकडून करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांवर अंकुश लावण्यात आला आहे. पशुंच्या नोंदणीला व्यापक प्रतिसाद मिळत असून, पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुंची महापालिकेत नोंदणी करून घ्यावी.
- सुधीर गावंडे,
पशुशल्यचिकित्सक, महापालिका