बसपाने रोखले आयुक्तांचे वाहन
By Admin | Updated: February 11, 2016 00:27 IST2016-02-11T00:27:20+5:302016-02-11T00:27:20+5:30
बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचे समस्या, प्रश्न ऐकूण न घेता महापालिका आयुक्त हे दालनाबाहेर गेल्यामुळे संप्तत झालेल्या ...

बसपाने रोखले आयुक्तांचे वाहन
दालनात विनापरवानगीने प्रवेश : अंगरक्षकांनी केली मध्यस्थी
अमरावती : बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचे समस्या, प्रश्न ऐकूण न घेता महापालिका आयुक्त हे दालनाबाहेर गेल्यामुळे संप्तत झालेल्या महिलांनी त्यांचे वाहन रोखले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आयुक्तांचे अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्यांने मध्यस्थी करुन वाहन गर्दीतून काढले. ही घटना बुधवारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे दालनात काही पत्रकारांशी चर्चा करीत असताना अचानक बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडीच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी नगरसेवकांसह त्यांच्या दालनात विनापरवानगीने प्रवेश केला. महिलांची गर्दी बघून आयुक्त गुडेवार थोडसे नाराज झाले. समस्या, प्रश्नांचे निवेदन स्वीकारुन ते दालनातून बाहेर पडले. दरम्यान महिला घरकुल, शौचालय, बीपीएल यादीत घोळ, म्हाडा अंतर्गत वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेत झालेल्या अपहाराची माहिती सोनाली मेश्राम देत असताना आयुक्तांनी बसपाचे काहीही ऐकून न घेता थेट दालनातून बाहेर निघून गेलेत, असा आक्षेप बसपाने घेतला. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांचे वाहन रोखले. समस्या, प्रश्न समजून घेण्यासाठी वाहनांसमोर घेराव घातला. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. अखेर आयुक्तांचे अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्यांनी बसपा कार्यकर्त्यांना वाहनासमोरुन हटविले. त्यानंतर आयुक्त गुडेवार हे वाहनात बसून बंगल्याकडे रवाना झाले.
आयुक्त म्हणाले, तुम्ही खुर्चीवर बसा, मी जातो!
आयुक्तांच्या दालनात अचानक बसपाचे कार्यकर्ते, महिलांनी प्रवेश केला. काही वेळ तर आयुक्तांनी कळले नाही ही गर्दी कशासाठी? मात्र महिलांनी समस्यांनी पाढा वाचला असताना त्या सोडवू, असे आयुक्त म्हणाले. दरम्यान नगरसेवक दीपक पाटील, सुदाम बोरकर यांनी वेगळ्या भाषेत आयुक्तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेंव्हा आयुक्त म्हणाले, ‘तुम्ही खुर्चीवर बसा मी बाहेर जातो!’ असे म्हणताच त्यांनी खुर्ची सोडली अन् गर्दीतून वाट काढत दालनाबाहेर पडताच वाहन गाठले.